LIVE UPDATES

'मित्र' उपक्रमांतर्गत आनापानसती कार्यशाळा उत्साहात संपन्न

५६ केंद्रप्रमुखांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी उपक्रम ठरणार प्रभावी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 13, 2026 12:09 PM
views 25  views

तळेरे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच विपश्यना विशोधन विन्यास, इगतपुरी (जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'मित्र' (Mind In Training for Right Awareness - MITRA) उपक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांसाठी आयोजित आनापानसती प्रशिक्षण कार्यशाळा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) आणि कोकणसिंधू विपश्यना मेडिटेशन सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कणकवली, देवगड, मालवण आणि वैभववाडी या चार तालुक्यांतील ५६ केंद्रप्रमुखांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत झालेल्या सलग तीन तासांच्या प्रशिक्षणामध्ये सर्व सहभागी केंद्रप्रमुखांनी शिस्तबद्ध आणि एकाग्र वातावरणात सहभाग घेत आनापानसती ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.कार्यशाळेदरम्यान आनापानसती ध्यानाची संकल्पना, त्यामागील वैज्ञानिक आधार, विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासातील त्याचे महत्त्व तसेच 'मित्र' उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण मार्गदर्शक म्हणून धम्मपदेस, कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, रत्नागिरीचे विश्वस्त व चिल्ड्रन्स कोर्स टीचर (CCT) संतोष आयरे तसेच विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे येथील सहाय्यक प्राध्यापक व चिल्ड्रन्स कोर्स टीचर (CCT) प्रा. प्रशांत हाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सहभागी केंद्रप्रमुखांना आनापानसती ध्यानाचे प्रात्यक्षिक करून त्यामागील तत्त्वज्ञान आणि शालेय स्तरावरील उपयुक्तता प्रभावीपणे उलगडून सांगितली.कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, सलग तीन तास जमिनीवर बसून ध्यानसाधना करताना सर्व केंद्रप्रमुखांनी उल्लेखनीय एकाग्रता आणि शिस्त राखली. प्रशिक्षणानंतर आयोजित अनुभवकथन सत्रात अनेकांनी "अंतर्मनाशी संवाद साधण्याची ही विलक्षण संधी होती," "मन शांत, प्रसन्न आणि स्थिर झाल्याचा अनुभव आला," तसेच "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल," अशा भावना व्यक्त केल्या. काहींनी या साधनेमुळे वैयक्तिक जीवनातही सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

या प्रशिक्षणाद्वारे केंद्रप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना आनापानसती साधनेचे प्रशिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात जिल्ह्यातील शाळांमध्ये 'मित्र' उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, भावनिक संतुलन, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक स्वास्थ्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी कोकणसिंधू विपश्यना मेडिटेशन सेंटर, सिंधुदुर्गचे विश्वस्त डॉ. राजेंद्र पारकर, अनिल पंडित तसेच दीपा जाधव, भाग्यश्री हाटकर, आदित्य बटवाले आणि सुरेखा आयरे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सिंधुदुर्ग, कोकणसिंधू विपश्यना मेडिटेशन सेंटर, सिंधुदुर्ग आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

कार्यशाळेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागी केंद्रप्रमुखांनी व्यक्त केलेले सकारात्मक अनुभव लक्षात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मित्र' उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या प्रशिक्षणाने भक्कम पाया घातला असून विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.