
सावंतवाडी : आंबोली गावठणवाडी येथील डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी ओवळीये येथील ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती तयार करणे व सुशोभीकरणाच्या कार्यासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला.
यापूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी त्यांनी १ लाख २१ हजार १२१ रुपयांचे आर्थिक सहकार्य केले होते. त्यामुळे मंदिराच्या कार्यासाठी त्यांनी केलेल्या देणगीचे एकूण मूल्य १ लाख ७२ हजार १२१ रुपये झाले आहे. श्री देव गांगोबा मंदिराचा जीर्णोद्धार सध्या सुरू असून, मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती तयार करणे व सुशोभीकरणाचे काम ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्याने सुरू आहे. या कार्यासाठी डॉ. सावंत यांनी दिलेल्या देणगीचा धनादेश संतोष सावंत, शशिकांत सावंत, हनुमंत सावंत, प्रकाश सावंत, सदानंद सावंत, मोहन सावंत, महादेव सावंत, अजय सावंत आणि हनुमंत शेडगे यांच्याकडे सखाराम सावंत (ऑनलाईन) व देवस्थानचे मानकरी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
डॉ. चंद्रकांत सावंत हे आंबोली गावठणवाडी येथील रहिवासी असून, ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चौकुळ नं. ५, नेने येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गणित विषयातील शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट पदवीसह त्यांना एकूण १८ मानद डॉक्टरेट पदव्या प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांच्या कार्याची विविध सन्मानांद्वारे गौरव नोंद झाली आहे.
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक सहकार्य करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील ८० शाळांतील ११६ विद्यार्थिनी, पाच माध्यमिक शाळांतील २५ विद्यार्थिनी, एका खासगी प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थिनी आणि एका महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीसह एकूण ८७ शैक्षणिक संस्थांमधील १४७ विद्यार्थिनींना कायमस्वरूपी दत्तक घेत त्यांनी एकूण ४ लाख ६१ हजार रुपयांची देणगी दिल्याची माहिती देण्यात आली.
शैक्षणिक कार्यासोबतच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही डॉ. सावंत सातत्याने योगदान देत आहेत. श्री देव गांगोबा मंदिराच्या पुढील कार्यासाठीही शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी शक्य असलेल्या सर्वांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. डॉ. चंद्रकांत सावंत यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








