LIVE UPDATES

ताज प्रकल्पाच्या त्रिपक्ष कराराला मान्यता !

आजगाव ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सीएमना भेटणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2026 14:50 PM
views 109  views

• नळपाणी योजनेत भ्रष्टाचार चुकीचा : आम. दीपक केसरकर 

सावंतवाडी : शिरोडा ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून या करारानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. १८५ खातेदारांना ६० कोटींची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे शिरोडा गावात क्रांती होत आंतरराष्ट्रीय पातळीवर गावाचे नावलौकिक होईल असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच आजगाव येथील ग्रामस्थांच्या भूमीकेसोबत मी असून ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अशी माहिती दिली. तर शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार होण चुकीचं आहे. लोकनियुक्त प्रतिनीधींनी असा प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते ब़ोलत होते. 

माजी मंत्री, आम. केसरकर म्हणाले, शिरोडा ताज प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक आज झाली. या बैठकीत समितीच्या सदस्यांसह प्रांताधिकारी, वेंगुर्ला तहसीलदार, ताज गृपचे प्रतिनिधी, भू-मापन अधिकारी, वेळागर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून ताज गृप, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व स्थानिक समितीत हा करार होणार आहे. या करारानंतर एमटीडीसी व ताज गृपच्या जॉईंट अकाउंटला पैसे जमा होणार असून त्यानंतर ते पैसे लोकांना मिळणार आहेत. त्यावेळीच्या भूसंपादनावेळी काही जणांनी पैसे स्वीकारले नव्हते. त्यात आता नव्या दराने पैसे स्थानिक शेतकऱ्यांना दिले जाणार असून त्यांनी पैसे स्वीकारावे. मयत लोकांचा वारस तपास करून घ्यावा, त्यांनाही हे पैसे दिले जातील. हा मोबदला सर्वांना मिळणार असून १८५ खातेदारांना ही रक्कम मिळणार आहे. ६० कोटीची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार आहे. ताज गृपचा हा प्रश्न तांत्रिक बाबींच्या अडचणींमुळे रखडला होता. आता तो सुटला असून स्थानिकांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे‌. नोकर भरतीत देखील स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असून जमीनी गेलेल्या लोकांना देखील तिथे सामावून घेतलं जाणार आहे. २ एकर जागा पर्यटनासाठी ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे. पुढच्या बैठकीत सरपंच, उपसरपंच असणार असून ५२ हेक्टर जागा दिली आहे‌. वाद असणाऱ्या जागा वगळण्यात आल्या असून त्याबाबत स्वतंत्र बैठका घेतल्या जातील. यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पालकमंत्री नितेश राणे, शिरोडा ग्रामपंचायत, ताज गृपन मदत केल्याने शिरोडा गावात क्रांती होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाव येईल असा विश्वास आम. केसरकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, आजगाव येथील लोकांना जर एखादा प्रकल्प नको असेल तर ते प्रकल्प होऊ नयेत. जर ग्रामस्थांचा विरोध नसेल तरच ते प्रकल्प व्हावेत.  लोकांचा विरोध असताना काही होऊ नये. कालच्या या प्रकरणात स्थानिक लोकांवर दाखल केलेले गुन्हे बघता तरूणांच भवितव्य धोक्यात येत. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये. मायनिंगला सरकारने परवानी दिली तरीही जनसुनावणी शिवाय पुढील परवानगी दिली जाऊ शकत नाही. लोक या जनसुनावणीत विरोध करू शकतात. त्यावेळी लोकभावनेसह मीही राहणार आहे. सर्व्हे झाला म्हणजे मायनिंग होणार असं नाही. मी ग्रामस्थांसह असून त्यांच्यावर झालेल्या केसीस मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.


तसेच नगरपरिषदेस पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असून लवकरच हक्काचा मुख्याधिकारी मिळेल. यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. शहरातील लोकांना २४ तास पाणी मिळावं म्हणून नळपाणी योजना आणली असून त्याच काम दर्जेदार व्हाव याची काळजी लोकनियुक्त प्रतिनिधींनी घ्यावी. या योजनेत भ्रष्टाचार होण चुकीचं असून ते घडू नये म्हणून नागरिकांनी काळजी घेतली असेल तर त्यांचे मी स्वागत करतो. माझंही लक्ष या कामावर असून यातील त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या. साठवण टाक्यांची काम देखील लवकर पूर्ण व्हायला हवी. तसेच माजगाव येथे नवीन धरण होत असून गावासह लगतच्या शहरी भागात तिथून पाणी पुरवठा होईल. ५७ कोटीची योजना देखील गुरुत्वाकर्षणावर चालणारी असून नव्या योजनेमुळे कोलगावच्या देखील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच गुरूत्वाकर्षणावरच हे पाणी लोकांपर्यंत येणार असल्याने पाणी बील कमीत कमी राहिलं. तसेच शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत सुचना संबंधिताना केल्या आहेत. माझं पूर्ण सहकार्य चांगल्या कामासाठी आहे. 

तसेच आंबोलीला मुंबई विद्यापीठाचा उप परिसर करण्यासाठी सुचवलं होतं. तशी मागणी विद्यापीठाने केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जागा निश्चित केली जाणार आहे. उपलब्ध जमीनीत पर्यटन १५० एकर व ५० एकर जमीनीवर शैक्षणिक विकास करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही होईल. तर, चौकुळच जमिन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आंबोली, चौकुळची मोजणी झाल्यानंतर जमीन वाटपाला सुरूवात होईल. वन जमिनींचा निर्णय लागल्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्हीच वाटप एकत्रित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच आमसभा देखील लवकरच घेण्यात येईल. पंचायत समितीत प्रशासकीय राजवट असल्याने ती झाली नाही. तर पाणी हे सर्वांसाठी असून पर्यटनासाठी पाणी आवश्यक आहे. उपसभापती यांनी म्हटलेल्या गोष्टीसाठी जलजीवनमधून पाणी दिलेलं नाही. विविध योजनांच्या माध्यमातून मी गावांना पाणी देण्याच काम केल. उपसभापती नवीन असल्याने त्यांना यांची कल्पना नसेल त्यांना याची माहिती देईन, माझ्या मतदारसंघात सर्वाधिक योजना सुरू आहेत अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली‌. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते