
सावंतवाडी : सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि आंबोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २५ मे रोजी आंबोली विभागातील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. आंबोली गावात पहिल्यांदाच अशा प्रकारचा विभागवार मेळावा अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जगप्रसिद्ध विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभाने झाली. याप्रसंगी संस्थेच्या कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल वाचन केला.
या मेळाव्याला आंबोली गावच्या सरपंच सौ. सावित्री पालयेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस.जी. गोसावी, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सौ. सविता गावडे, विनायक देसाई, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, पवित्रा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. आम्ही थेट तुमच्यापर्यंत तुमच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहोत. दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी मांडून या मेळाव्याचा व शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन शिंगाडे यांनी यावेळी केले.
आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालयेकर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुमच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील, त्या आमच्याकडे मांडायला संकोच करू नका, आम्ही त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच इतर तांत्रिक अडचणींचे निवारण अनिल शिंगाडे सरांच्या माध्यमातून करून घ्यावे, असे आवाहन केले.
या मेळाव्यामध्ये ४० हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पटकारे आणि सिद्धी पडवळ यांना श्रवणयंत्र (काformची मशीन) प्रदान करण्यात आले, तर बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक (चालण्याची काठी) देण्यात आली. याशिवाय उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना संस्थेच्या वतीने उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्था कर्मचारी श्रीमती शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा विशेष मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, त्या सर्वांचे आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी विशेष आभार मानले.











