LIVE UPDATES

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

निष्काळजीपणा करणाऱ्यांना निलंबनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 19:16 PM
views 39  views

कुडाळ : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत मतदार यादी सुधारणा, गणनापत्र वाटप आणि संगणकीकरणाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या संबंधित अधिकारी व बी.एल.ओ. (BLO) यांच्यावर थेट निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यासारखी कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे.

कुडाळ तालुक्यातील गणनापत्र वाटपाची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे आयोजित बैठकीत संबंधित यंत्रणेला फैलावर घेतले. तसेच जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीची ई-केवायसी प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या आढावा बैठकीत प्रशासनाने मोहिमेच्या गतीसाठी निश्चित कालमर्यादा आखून दिली आहे. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) व पर्यवेक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील गणनापत्रांचे १००% वाटप येत्या १० जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

नागरिकांकडून संकलित केलेल्या गणनापत्रांचे अचूक ऑनलाईन संगणकीकरण २० जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाचे हे काम राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. तांत्रिक कारणांशिवाय कामात असहकार्य करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी  तृप्ती धोडमिसे यांनी कृषी व महसूल विभागाला गावपातळीवर तातडीने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. कोणतीही तांत्रिक त्रुटी न ठेवता सर्व संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, जेणेकरून नुकसान भरपाईचा लाभ थेट आणि वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी बजावले.

कुडाळ तहसीलदार कार्यालयात आज दुपारी ३.०० वाजता झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कुडाळ), सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार (कुडाळ) सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी (पं.स. कुडाळ), गट शिक्षणाधिकारी (पं.स. कुडाळ), तालुका कृषी अधिकारी (कुडाळ), प्रशासकीय अधिकारी (नगरपंचायत कुडाळ) तसेच तालुक्यातील सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षक उपस्थित होते.