LIVE UPDATES

पाळयेतील आंदोलकांची दीपक केसरकरांनी घेतली भेट

कायमस्वरूपी तोडग्याचे आश्वासन : लवकरच वनमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 19:56 PM
views 25  views

दोडामार्ग : पाळये दशक्रोशीतील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव आणि त्यामुळे शेती, फळबागा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी पाळये येथे सुरू असलेल्या उपोषणाची माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट देऊन दखल घेतली. हत्तीप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीला पाळये दशक्रोशीतील आंदोलकांचे शिष्टमंडळही उपस्थित राहील, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.

पाळये दशक्रोशी हत्ती वन्यप्राणी हटाव कृती समितीच्या वतीने ‘मनुष्य वाचवा–वन्यप्राणी हटवा’ या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. यावेळी आंदोलकांनी यापूर्वीही हत्तीप्रश्नी अनेक आंदोलने व बैठका झाल्या; मात्र आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली. नुकसानभरपाई हा कायमस्वरूपी उपाय नसून हत्तीप्रश्नाचा मुळातून तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

तिलारीच्या मागील भागात कंपाऊंडचा प्रस्ताव....

केसरकर यांनी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे दर वाढविण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तिलारीच्या मागील भागात कंपाऊंड करून हत्ती तेथे ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. या संदर्भातील निर्णय येत्या महिनाभरात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील हत्तींची वनतारा किंवा तत्सम संस्थांमध्ये रवानगी करण्याची मागणीही कृती समितीने केली.

‘दिल्लीपर्यंत जाऊन उपोषण करावे लागले तरी करू’....

आंदोलकांनी केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. ‘नुकसान भरपाई ही क्षणिक बाब आहे. आमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी उपोषण करूनच शासनाचे लक्ष वेधावे लागणार का?’ असा सवाल करण्यात आला. गरज पडल्यास दिल्लीपर्यंत जाऊन उपोषण करावे लागले तरी करू, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

‘दोडामार्ग तालुका हा इच्छा नसताना घातलेलं मूल आहे का, की प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नांसाठी उपोषणच करावे लागणार?’ असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला. हत्तींचा प्रश्न केवळ नुकसानभरपाईपुरता मर्यादित नसून शेतीचे अस्तित्व, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या जीविताशी संबंधित असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

वाढीव नुकसानभरपाई आणि सौरकुंपणाची मागणी....

हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वाढीव नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीने केली आहे. नारळासाठी ३० हजार, काजूसाठी २० हजार, आंब्यासाठी ३० हजार, सुपारीसाठी २० हजार, केळीसाठी ८०० रुपये प्रति झाड आणि भातासाठी ७०० रुपये प्रति गुंठा भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५० लाख रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

शेती व फळबागांचे संरक्षण करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सौरकुंपण उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.

सोमवारी उपवनसंरक्षकांची बैठक....

केसरकर यांच्या आश्वासनानुसार येत्या सोमवारी उपवनसंरक्षक दोडामार्गात येऊन अधिकारी, शेतकरी आणि आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मंत्रालयात वनमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हत्तीप्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, वनक्षेत्रपाल संभाजी पाटील, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम यांच्यासह महसूल व वन विभागातील अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस आदी उपस्थित होते.

या उपोषणाला दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना, सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघ, नर्सरी धारक संघटना, कृषी पदवीधर संघ, राजा शिवाजी महाराज शेतकरी संघटना, दोडामार्ग फळबागायतदार शेतकरी संघ यांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

पाळये दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याचा दावा कृती समितीने केला असून, शासनाने आता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शेतकरी संघ यांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पाळये दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याचा दावा कृती समितीने केला असून, शासनाने आता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.