
देवगड : देवगड तालुक्याने यापूर्वीही विविध आपत्कालीन परिस्थितींवर एकजुटीने मात केली आहे. यावेळीही सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. प्रसंगी दिवस-रात्र काम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प ) जयप्रकाश परब यांनी केले.
पंचायत समिती देवगड येथे दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापती अमोल लोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आणि गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली.
या आढावा सभेत दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये सुचविण्यात येणारी कामे, वनराई बंधारे व कच्चे बंधारे बांधणे, तसेच VBGRAM अंतर्गत जलतारा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने व अचूक पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. १५ वा वित्त आयोग अंतर्गत उपलब्ध निधी व त्यातून हाती घेण्यात येणाऱ्या कामांबाबतही सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक नियोजन करून पाणी उपलब्धता, जलसंधारण आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले .
यावेळी व्यासपिठावर उपअभियंता अनिल तांबे, सहाय्यक अभियंता ग्रा. पा. पु रोशन सुर्यवंशी, विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर, विस्तार अधिकारी तुषार हळदणकर, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कनिष्ठ अभियंता रोशनी झोपले, कनिष्ठ अभियंता पाटील, कनिष्ठ अभियंता विकास पवार, अधिक्षक कुणाल मांजरेकर आदी उपस्थित होते. या आढावा सभेचे सुत्रसंचलन व आभार विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर यांनी मानले .










