
देवगड : कोकणचा राजा आणि अस्सल चव, मोहक सुगंध व दर्जेदार गुणवत्तेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याने यंदाच्या हंगामापूर्वीच बाजारपेठांमध्ये आपली हजेरी लावली आहे. देवगड हापूसचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगडमधील आंबा बागायतदारांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील वाशी आणि पुणे येथील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याच्या पेट्या पाठविल्या आहेत. यापूर्वी देवगडमधील दोन आंबा बागायतदारांनी वाशी बाजारपेठेत आंब्याच्या पेट्या पाठविल्या होत्या. त्यानंतर आता पुणे बाजारपेठेतही देवगड हापूसच्या पहिल्या पेट्या रवाना झाल्याने आंबा उत्पादक आणि व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर देवगडचे वीरेंद्र दत्तात्रय कांबळी आणि कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम तर्फे यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या पुणे बाजारपेठेसाठी रवाना करण्यात आल्या. वीरेंद्र कांबळी यांनी सहा डझन क्षमतेच्या एकूण तीन पेट्या, तर शेतकरी दिलीप तर्फे यांनी पाच डझनची एक आणि साडेपाच डझन क्षमतेच्या तीन पेट्या पुण्याला पाठविल्या आहेत. देवगड मधील साई आंबा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या पेट्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथील नामदेव रामचंद्र भोसले (एन.आर.बी., गाळा क्रमांक ९०५/९०६) येथे रवाना करण्यात आल्या आहेत.
आंबा हंगामाला अद्याप अधिकृत सुरुवात होण्यास अवकाश असतानाच उत्पादन घेऊन बाजारपेठेत पहिल्या पेट्या पाठविण्याची किमया या दोन्ही बागायतदारांनी साधली आहे. बागेची योग्य निगा, उत्पादनाचे नियोजन आणि अनुकूल हवामान यांच्या जोरावर त्यांनी हंगामापूर्वीच हापूसचे उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांचे आंबा उत्पादक आणि व्यापारी वर्गातून विशेष कौतुक होत आहे.
देवगड हापूसची वैशिष्ट्यपूर्ण चव, मनमोहक सुगंध आणि उत्कृष्ट दर्जा यामुळे पुणे आणि वाशी यांसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये या आंब्याला विशेष मागणी असते. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दोन प्रमुख बाजारपेठांमध्ये देवगड हापूसच्या पेट्या दाखल झाल्याने आगामी हंगामाची गोड चाहूल लागली आहे. या पहिल्या पेट्यांना व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि किती बाजारभाव मिळतो, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर पुणे बाजारपेठेत झालेली पहिली पाठवणी आणि यापूर्वी वाशी बाजारपेठेत पोहोचलेल्या पेट्या यामुळे देवगड हापूसने हंगामापूर्वीच बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. यंदा हवामान अनुकूल राहून आंब्याचे भरघोस उत्पादन मिळावे आणि शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षा आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.








