LIVE UPDATES

नीता निळकंठ दीक्षित महिला महाविद्यालयाचं शानदार उद्घाटन

ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी देणारे दीक्षित महिला महाविद्यालय ठरणार दिशादर्शक
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 23, 2026 16:39 PM
views 140  views

देवगड : शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना चिंतन करायला शिकविणारे प्रभावी माध्यम आहे. चिंतनशील समाजच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार, आधुनिक व वेगळ्या पद्धतीचे शिक्षण उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. देवधर यांनी केले. विद्या विकास मंडळ संचलित श्रीमती नीता निळकंठ दीक्षित महिला महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे हायस्कूलच्या नलावडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद देवधर व दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी माजी आमदार, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित गोगटे,  प्रवीण जोग, दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, प्राचार्य सौ. बलवान, अँड. अविनाश माणगावकर, महेश रानडे, प्रशांत वारीक, नम्रता तावडे, संतोष कुलकर्णी, राजेंद्र वालकर, सुनील जाधव,संतोष किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

देवधर पुढे म्हणाले की, समाजाचे चिंतन आपल्याला विचार करायला शिकवते, तर शिक्षण मूलतः चिंतन करण्याची क्षमता विकसित करते. समाज जेव्हा आपल्या प्रश्नांवर विचार करू लागतो, तेव्हा त्याची प्रगती सुरू होते. शिक्षण म्हणजे गाव सोडणे नव्हे आणि अति शिक्षण म्हणजे देश सोडणेही नव्हे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान मिळवून आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान देणारी पिढी घडणे आवश्यक आहे. मंदिरात देवासमोर डोके ठेवणारी माणसे अनेक आहेत; मात्र ज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी मिळवून समाजाच्या विकासासाठी योगदान देत पुन्हा देवासमोर डोके ठेवणारी पिढी निर्माण झाली, तर समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी आई-वडिलांच्या नावाने कोकणातील पहिले महाविद्यालय सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी विद्या विकास मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे त्यांनी विशेष आभार मानले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच चिंतनाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अँड अविनाश माणगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेतील मर्यादित सोयी-सुविधांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील शिक्षकांना तुटपुंज्या सुविधा उपलब्ध असताना पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन वेगळ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे. विद्या विकास मंडळाने सुरू केलेला महिला महाविद्यालयाचा उपक्रम कौतुकास्पद असून दीक्षित कुटुंबाने ग्रामीण भागातील शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया आणि त्यामागील संकल्पना याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड अभिषेक गोगटे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रेश्मा जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य सौ. बलवान यांनी मानले.