
देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, नेतृत्वगुणांचा विकास आणि निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या धर्तीवर मतदार यादी, उमेदवारी अर्ज, प्रचार, ईव्हीएम ॲपद्वारे मतदान आणि मतमोजणी अशा सर्व प्रक्रिया राबविण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी आदी विविध भूमिका पार पाडत प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घेतला.
मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर तसेच निवडणूक समितीतील राजेंद्र कोयंडे, सुरेश पवार, आफरीन पठाण, प्रसाद शेवडे आणि उमेश कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली असून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










