LIVE UPDATES

पावसाचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प !

रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर प्रणालीसाठी घरपट्टीत अतिरिक्त ५ टक्के सवलत | कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा महत्त्वाकांक्षी निर्णय
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 13, 2026 20:48 PM
views 30  views

देवगड : पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कुणकेश्वर ग्रामपंचायतीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. छतावरील पावसाचे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून भूजल पुनर्भरण करणारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तसेच एक किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेची सोलर ऑन-ग्रीड प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या करदात्यांना घरपट्टीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामानातील बदल, अल निनोचा संभाव्य प्रभाव, घटते पर्जन्यमान आणि भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी एप्रिल-मे महिन्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. देवगड तालुक्यातील कातळमय भूभागामुळे भूजल साठ्यांवरही मर्यादा येतात. त्यामुळे पावसाचे पाणी साठविणे व जमिनीत मुरविणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

यासोबतच सप्टेंबर २०२६ पूर्वी घरपट्टी भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी नियमित ५ टक्के करसवलतही सुरू ठेवण्यात आली आहे. जलसंवर्धन आणि ऊर्जा बचतीबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासक, कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या वतीने सांगण्यात आले. गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.