LIVE UPDATES

मतदारसंघातील 33 केव्ही वीज वाहिनी भूमीगत कामास निधी द्या !

मुख्यमंत्र्यांकडे दीपक केसरकरांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 10, 2026 21:00 PM
views 26  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 केव्ही वीज वाहिन्या भूमीगत करण्याच्या कामास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले आहे. मतदार संघातील बहुतांशी भाग हा अत्यंत दुर्गम, डोंगराळ, वाट जंगल व झाडा झुडपांनी वेढलेला आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यामुळे यामधून गेलेल्या वीज वाहिन्यांवर सातत्याने पावसाळयामध्ये झाडे मोडून पडण्याचे अथवा झाडांच्या फांदया लागून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर श्री. केसरकर यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, या वाहिन्यांचे बहुतांश लोखंडी पोल, फॅब्रीकेशन, डीटीसी स्ट्रक्चर फॅब्रीकेशन, मोठ्या प्रमाणावर सडलेले आहेत. तसेच वीज वाहक तारा जुन्या असल्यामुळे त्या तुटून पडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हा भाग जंगल व डोंगराळ असल्याने रात्रीच्यावेळी लाईन फॉल्ट काढण्याकरीता पेट्रोलिंग करणे अत्यंत जोखमीचे असल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे त्या वाहिन्यांअंतर्गत येणारी गावे अंधारात राहतात. परिणामी नागरिकांकडून आंदोलन, उपोषणे केली जातात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला दरवर्षी सामोरे जावे लागते. 33 के.व्ही. वाहिन्या या भूमीगत केल्यास विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण शून्य टक्के वर येणार आहे. तसेच वारंवार उद्भवणारी वीजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. याबाबत दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्ये संदर्भांत अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी सिंधुदुर्ग यांच्या समवेत दि. 09/06/2025 रोजी बैठक घेतली होती. 33 केव्ही वाहिन्या भूमीगत करण्यासाठी येणा-या खांबाबत सविस्तर तपशील देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सविस्तर अहवाल सादर केलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे निवदेन सादर केलेले होते. त्यानुसार आपल्या कार्यालया कडून अ.मू.स. उर्जा यांना तात्काळ कार्यावाहीसाठी आदेश दिले होते. अधिक्षक अभियंता (सं.व.सु) सिंधुदुर्ग मंडळ यांनी मुख्य अभियंता (वितरण), प्रकाश गड बांद्रा पूर्व मुंबई यांचकडे अहवाल सादर केलेला आहे. परंतू, वरील प्रस्तावावर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाला असून वारंवार विज खंडीत होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालेला असून वारंवार आंदोलने व उपोषणे होत आहेत. लोकप्रतीनिधी व आमदार या नात्याने मला जनतेच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. तरी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 के. व्ही. वाहिन्या भूमीगत करण्याच्या कामास लवकरात लवकर मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

नामकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार !

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी रेल्वे स्थानकास कोकण रेल्वेचे शिल्पकार, ज्येष्ठ समाजवादी नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देऊन 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने आम. केसरकर यांनी आभार मानले आहेत.