
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
शासनाने सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. मात्र, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रमोद जठार यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले.
या निवेदनात आंबा-काजू बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, ‘पोटखराबा’ क्षेत्राचा नुकसानभरपाईमध्ये समावेश करण्यात यावा, जिल्ह्यातील १०० टक्के पात्र नागरिकांना रेशनचा लाभ मिळावा तसेच मनरेगामधील जाचक जिओटॅगिंगची अट रद्द करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
रत्नागिरीतील शेतकरी आणि बागायतदार सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात असून, त्यांना शासनाकडून तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांनी बळीराजाच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी ठाम भूमिका मांडली. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
“रत्नागिरीतील माझ्या बळीराजाच्या आणि जनतेच्या हक्कांसाठी हा लढा अविरत सुरू राहील. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.











