
रायगड : श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा, नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जिवाशी खेळ!' करणाऱ्या कंत्राटदारा विरोधात पत्रकारांनी आवाज उठवला होता. कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून अत्यंत कमी खोलीवर या हाय व्होल्टेज अंडरग्राउंड केबल्स टाकल्याचं उघड झालं होतं.
पण सर्वात मोठी आणि संतापजनक गोष्ट काय असेल, तर अनेक माध्यमानी आवाज उठवूनही महावितरणच्या मुजोर प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला आहे! होय, या अंधाधुंद कारभारावर प्रसारमाध्यमांनी वारंवार कोरडे ओढले, पण अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत. बातम्या आल्यानंतर केवळ दाखवण्यापुरतं, महावितरणने या उघड्या पडलेल्या वाहिनीवर वरचेवर खडी माती टाकून काम दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण पहिल्याच पावसात ही माती आणि खडी वाहून गेली आणि महावितरणचे 'पाप' पुन्हा एकदा रस्त्यावर उघडं पडलं!
सध्या कुरवडे येथील मुख्य रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आहे आणि महावितरणची ही जीवघेणी अंडरग्राउंड केबल थेट रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडली आहे. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना समोरच्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडला, आणि चालकाने गाडी किंचित जरी बाजूला घेतली, तर थेट या हाय व्होल्टेज वाहिनीवर गाडी जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक आता संतप्त सवाल विचारत आहेत की, "महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची आणि निष्पाप नागरिकाच्या बळीची वाट पाहतंय का?" माध्यमानी दिलेल्या इशाऱ्याकडे कानाडोळा करणाऱ्या या मुजोर प्रशासनाला कधी जाग येणार? असा सवाल आता उपस्थित होतं आहे.












