
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी सेवेत जाण्यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल अकॅडमीच्या नवीन स्वमालकीच्या वास्तूचे उद्घाटन ओरोस येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. सुनील धोनुकसे आणि श्रद्धा धोनुकसे या दाम्पत्याने पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही वास्तू नव्या आशा, संधी आणि यशाचे केंद्र ठरणार आहे.
सुनील धोनुकसे यांच्या मातोश्री सुशीला धोनुकसे आणि वडील गणपती धोनुकसे यांच्या हस्ते रिबीन कापून नवीन वास्तूत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी वास्तूची पाहणी केली. या उद्घाटन सोहळ्यास पद्मश्री परशुराम गंगावणे, संविता आश्रमचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते संदीप परब, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते छोटू पारकर, डिंगणेचे माजी सरपंच जयेश सावंत, सुधाकर जांभेकर, योगेश तावडे, कपिल धोणुकसे, अर्जुन मोरजकर, प्रथमेश सावंत, चेतन गंगावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दयानंद कुबल यांनी, “सिंधुदुर्गच्या लाल मातीत इतिहास घडविण्याची ताकद आहे. येथील युवकांनी परिस्थितीला दोष न देता मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर आपले ध्येय गाठले पाहिजे. यश मिळेपर्यंत थांबू नका,” असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात गरुडझेप घेऊन आपले ध्येय प्राप्त करावे, तसेच प्रशासनातील विविध पदांवर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे; योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास हे विद्यार्थी भविष्यात अधिकारी बनून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गुरुकुल अकॅडमीची स्वतःच्या मालकीची वास्तू उभारण्याचे स्वप्न सुनील धोनुकसे आणि श्रद्धा धोनुकसे यांनी पाहिले होते. विद्यार्थ्यांना केवळ शिकवणी नव्हे, तर अभ्यास, निवास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक परिपूर्ण वातावरण मिळावे, या विचारातून या वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.
गुरुकुल अकॅडमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे २०० विद्यार्थ्यांना एकत्र राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, त्यांचा वेळ प्रवासात वाया जाऊ नये आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण दिनचर्या निर्माण व्हावी, या उद्देशाने निवासी व्यवस्थेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात येतो. नियमित अभ्यासाबरोबरच वेळेचे नियोजन, शिस्त, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, सराव परीक्षा, परीक्षेचे नियोजन आणि मुलाखतीसाठी आवश्यक आत्मविश्वास यांसारख्या बाबींवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते.
गुरुकुल अकॅडमीने आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना विविध सरकारी नोकरभरती परीक्षांमध्ये यश मिळवून देत त्यांच्या करिअरला दिशा दिली आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर सरकारी सेवेत प्रवेश मिळवू शकतो, हे या विद्यार्थ्यांच्या यशातून सिद्ध झाले आहे असा विश्वास प्रोफेसर सुनील धोनुकसे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी व्हावी आणि आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार मार्गदर्शन व निवासी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा अकॅडमीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे. हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
“शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद सिंधुदुर्गच्या युवकांमध्ये आहे. लाल माती ही इतिहास घडविणाऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यश प्राप्त केल्याशिवाय थांबू नका,” असा संदेश पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी युवांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एस. जांभेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा.सुनील धोनुकसे यांनी मानले.
नवीन वास्तूमुळे गुरुकुल अकॅडमीच्या कार्याला आणखी बळ मिळाले असून, सिंधुदुर्गच्या मातीतून अधिकाधिक अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि यशस्वी तरुण-तरुणी घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ही वास्तू केवळ इमारत नसून जिल्ह्यातील असंख्य युवकांच्या स्वप्नांना आकार देणारे “यशाचे गुरुकुल” ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










