LIVE UPDATES

दोडामार्ग आठवडा बाजारात मद्यधुंद चालकाचा धिंगाणा

अनेक वाहनांना ठोकर | जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 21:20 PM
views 64  views

दोडामार्ग :  दोडामार्गात रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेतील गोवा बिचोलीम येथील एका वाहन चालकाने बेफाम वाहन चालवत चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. यानंतर त्याच्या या कृत्याबाबत विचारणा करणाऱ्या एका नागरिकाला बेदम मारहाण केल्याने बाजार परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्यावर काय कारवाई करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

दोडामार्गचा आठवडा बाजार हा तालुक्यातील तसेच शेजारील गोवा राज्यातील नागरिकांसाठी खरेदीचे प्रमुख ठिकाण आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीत गोव्यातील एका चालकाने मद्याच्या नशेत वाहन चालवत रस्त्यावरील चार-पाच वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी चालकाला अडवून त्याच्याकडे जाब विचारला. मात्र, त्यावेळी संबंधित चालकाने आक्रमक भूमिका घेत एका व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सध्या चौकशी सुरू असून वाहनांचे झालेले नुकसान, मारहाणीचा प्रकार आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बाजाराच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.