
सावंतवाडी : तिरोडा-नाणोस जोडणाऱ्या नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला काही दिवसांतच तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जागृत ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुलाला तडे गेल्याने वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू असून, धोकादायक ठिकाणी पुलाच्या एका बाजूला बॅरल लावून वाहनचालकांना सावध करण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती लोकप्रतिनिधींना मिळताच त्यांनी तातडीने पुलाची पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या.
नवीनच बांधण्यात आलेल्या पुलाला एवढ्या लवकर तडे गेल्याने पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सद्यस्थितीत हा पूल धोकादायक असल्याने संबंधित विभागाने तसेच ठेकेदाराने तातडीने आवश्यक उपाययोजना करून पुलाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी आणि भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी केली आहे.










