
सावंतवाडी : पाणीपुरवठा विभागाच्या लेखापरीक्षणासाठी पुरवठा दाराकडून तब्बल दीड लाख रुपये घेण्यात आलेत. तसेच ७२ दिवसांच बील १७ लाख झालं असून आमच्या नगरसेविकांनी समितीच्या सभेत आक्षेप घेतल्यानेच बील अदा करण्यात आली नाही. अन्यथा, हे बील अदा झालं असते. तर चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर हेच बील १३ लाख, १० लाखांवर येऊन पोहचले. तसेच जमा-खर्चाचे रजिस्टर देखील गहाळ झाले. त्यामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपला राजीनामा सुपूर्द करावा. नगराध्यक्षांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी गटनेते बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर, पाणी पुरवठा समितीच्या सदस्या नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, नगरसेवक देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी समितीच्या बैठकीत याबाबतची स्पष्टता केली आहे. त्यामुळे 17 लाख रुपयांच्या बिलाच्या या घोटाळ्यात कोणाचा हात आहे ? यामागे सूत्रधार कोण आहेत ? त्याचा शोध घ्यायला हवा, सखोल चौकशी व्हायला हवी. तसेच सभापती प्रतिक बांदेकर यांनी देखील राजीनामा द्यायला हवा. अन्यथा, जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही धाव घेऊन तशी मागणी करणार आहोत. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत असून आजही एका व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत आंदोलनाला बसावं लागल हे दुर्दैव असल्याची टीका ॲड. सावंत-कविटकर यांनी केली.
दरम्यान, पाणीपुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घेतला गेला नाहीतर आम्ही स्वस्त बसणार नाही. जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेनेचे गटनेते बाबु कुडतरकर यांनी दिला.
आम्ही आवाज उठवला म्हणूनच बील अदा केल नाही. अन्यथा ते एवढ्यात अदाही केलं असतं. 15 ऑगस्टला आम्ही या विरोधात आंदोलनही केले. त्यामुळे सर्व भ्रष्टाचार उघडके झाल्याचे नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी सांगितले.
मोठी तफावत हिशोबात दिसत असून पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. रजिस्टर गहाळ झाल्यानंतर एफ.आय.आर दाखल करण्यासही विलंब होत आहे. त्यात प्रशासनाच्या ऑडिटसाठी दीड लाख रुपयांची मागणी पुरवाठादाराकडे करून ते घेतलेत. संबंधिताने ते मान्यही केलेत. आम्ही मागणी केलेल्या विशेष सभेत हे प्रकार उघडकीस आले. मात्र, या सभेत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यांच्या उपस्थितीत ही सभा व्हावी अशी आमची प्रमुख मागणी होती. त्यावेळी सभात्याग न करता आम्ही या प्रकरणातील सुत्रधार शोधून काढला असे मत व्यक्त केले.
तर ॲड. सायली दुभाषी म्हणाल्या, चोर सोडून संन्यासाला फाशी चालणार नाही. या प्रकरणाला जबाबदार असणारे कर्मचारी, अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तसेच पाणी पुरवठा सभापतींनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
तर प्रतिक बांदेकर यांनी नैतिकतेन राजीनामा द्यावा. अन्यथा, आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे यांनी दिला. पाणीपुरवठाच्या या विभागात लाखो रुपयांचे पाणी मुरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक बाबी उघड होतील. अद्याप प्रशासकीय काळातील विषयाला हात घातलेला नाही. मोठा अपहार यात झाला असून जनतेच्या पैशांचा अपव्यय कदापिही सहन करणार नाही असे मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले.











