LIVE UPDATES

कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी, यूपीएससीचे उपकेंद्र उभारण्याची मागणी

नगरसेवक मंदार शिरसाट घेणार कुलगुरूंची भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 10, 2026 17:14 PM
views 32  views

कुडाळ : सिंधुदुर्गातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळून भागातील जास्तीत जास्त मुले 'क्लास १ ऑफिसर' व्हावीत, यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे अधिकृत MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपकेंद्र सुरू करण्यासाठी सिनेट सदस्यांच्या माध्यमातून ते लवकरच विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.

संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या संवाद कार्यक्रमात मंदार शिरसाट यांनी ही मागणी लावून धरली. "जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असूनही सुसज्ज केंद्र नसल्याने त्यांना पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरसारख्या शहरांत जाऊन मोठा खर्च करावा लागतो. कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे केंद्र झाल्यास मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला व कणकवलीतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या मागणीची दखल घेत सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा गवळी आणि मयूर पांचाळ यांनी ऑक्टोबर महिन्यात कुलगुरूंसोबत तातडीची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीदरम्यान कुडाळमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि सविस्तर प्रस्ताव कुलगुरूंना सादर केला जाणार आहे.