LIVE UPDATES

गणेशोत्सवासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीची जय्यत तयारी

१८ विसर्जन घाटांवर स्वच्छता; ७ वाहनतळांची व्यवस्था, जीवरक्षकांसह आपत्ती व्यवस्थापन कक्ष
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 10, 2026 17:34 PM
views 24  views

देवगड : आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत ७ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. पायवाटा, काँक्रीट रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेले शेवाळ काढून ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे.

देवगड-जामसंडे शहरातील एकूण १८ गणेश विसर्जन घाटांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. घाटांकडे जाणारे पोहोच रस्ते, पायवाटा तसेच परिसराची साफसफाई करून आवश्यक ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक घाटावर नगरपंचायतीचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, गणेशमूर्ती विसर्जनानंतर जमा होणारे निर्माल्य स्वतंत्र निर्माल्य कलशात जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धोकादायक व संवेदनशील विसर्जनस्थळी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील बंद पथदिव्यांची दुरुस्ती करून ते गणेशोत्सवापूर्वी कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा तत्काळ सामना करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात सात वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले असून, देवगड-ब्राह्मणदेववाडी मार्गे एकेरी वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.

उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा यासाठी महावितरण कंपनीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत गरजेनुसार आरोग्य पथक नियुक्त करण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गालगत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील धोकादायक झाडी व गवत कटाईचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर आवश्यकतेनुसार भराव टाकणे आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.