
सिंधुदुर्गनगरी : अपुऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वर्षभराची मेहनत वाया जाण्याची वेळ आल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती हे प्रमुख पीक असून, अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे भातपिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी उभी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.
सिंधुदुर्गातील शेतकरी शेती करताना स्वतःची मेहनत, उपलब्ध साधनसामग्री आणि मर्यादित आर्थिक स्रोतांवर अवलंबून असतो. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी असल्याचा अर्थ शेतकरी संकटमुक्त आहे, असा होत नाही. पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून शासनाने तातडीने मदतीचा हात देणे आवश्यक आहे.
तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भातशेतीचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करावेत, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राची संयुक्त पाहणी करून अहवाल तातडीने सादर करावा, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडे विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवावा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी पीक नुकसानीचे मूल्यांकन करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, राज्य शासनाने विशेष आर्थिक मदत जाहीर करून पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ती विनाविलंब द्याव, पुढील हंगामासाठी बियाणे, खते व अन्य शेती निविष्ठांसाठी विशेष सहाय्य द्यावे अशा मागण्या केल्या आहेत.
सिंधुदुर्गातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना शाश्वत मदतीची गरज आहे त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित कदम यांनी केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








