LIVE UPDATES

Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर

वन्यप्राण्यांचा धोका ओळखणारे उपकरण विकसित
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 04:45 PM
views 101  views
Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.

चिपळूण : सावर्डे येथील 'सह्याद्री पॉलिटेक्निक'च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका हर्षला अरविंद राजेशिर्के यांनी विकसित केलेल्या 'ॲनिमल डिटेक्शन अँड मॉनिटरिंग डिव्हाइस' (ANIMAL DETECTION AND MONITORING DEVICE) या नावीन्यपूर्ण उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत 'डिझाईन पेटंट' (Certificate of Registration of Design No. 498790-001) मंजूर झाले आहे. या उल्लेखनीय यशामुळे सह्याद्री पॉलिटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण व बहुतांश शेती भागात वन्यजीवांमुळे पिकांचे होणारे अतोनात नुकसान आणि वाढणारा मानव-प्राणी संघर्ष ही एक मोठी समस्या बनली आहे. कु. हर्षला राजेशिर्के यांनी यावर तांत्रिक उपाय शोधून काढत 'ॲनिमल डिटेक्शन अँड मॉनिटरिंग डिव्हाइस' विकसित केले आहे. हे उपकरण शेताच्या किंवा मानवी वस्तीच्या परिसरात वन्य प्राण्यांची उपस्थिती वेळेत ओळखून अलर्ट देते. यामुळे पिकांची नासाडी रोखणे, वन्यजीवांचे रक्षण करणे आणि मानव-प्राणी संघर्ष कमी करणे शक्य होणार आहे.

संशोधन व बौद्धिक संपदा क्षेत्रात त्यांनी गाठलेला हा मोलाचा टप्पा सह्याद्री पॉलिटेक्निक आणि संपूर्ण परिसरासाठी अत्यंत भूषणावह ठरला आहे.

सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

या अभूतपूर्व यशाबद्दल हर्षला राजेशिर्के यांचे आमदार शेखर निकम , कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्राचार्य मंगेश भोसले आणि संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारची समाजोपयोगी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती घडो, अशा शुभेच्छा, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.