
सिंधुदुर्गनगरी : महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेले रस्ते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून जबाबदारीने वाहन चालविणे गरजेचे असल्याचे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र, कणकवलीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकूर यांनी केले आहे.
आपला प्रवास सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित, असे सांगत महामार्ग पोलिसांतर्फे वाहन चालकांना आवाहन करण्यात आले आहे की, निर्धारित वेगमर्यादेचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवावे, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करावा, मद्यसेवन करून वाहन चालवू नये कारण ते जीवघेणे ठरू शकते, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाहणे टाळावे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि घाईघाईने ओव्हरटेक करू नये.
मोटारसायकलने महामार्गावर प्रवास करताना हेल्मेट बंधनकारक असून रस्ते अपघातात डोक्यावर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वार व पाठीमागील व्यक्तीचा मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर झोप किंवा थकवा जाणवत असल्यास वाहन थांबवून विश्रांती घेऊनच पुढील प्रवास सुरू करावा, लेन शिस्त, दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक सूचनांचे पालन करावे. वेगापेक्षा जीवन अनमोल असून काही मिनिटे वाचविण्याच्या घाईत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये.
पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हट्टापायी त्यांच्याकडे वाहने देऊ नयेत, अशीही विनंती करण्यात आली आहे. रस्ते अपघात टाळणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून आपली सुरक्षा हाच आपल्या कुटुंबाचा आनंद असल्याचे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








