LIVE UPDATES

दोडामार्गची स्वच्छता आता ‘हायटेक'

सक्शन व्हॅनसह आधुनिक उपकरणे सेवेत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 16:54 PM
views 56  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : कसई दोडामार्ग शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी दोडामार्ग नगरपंचायतीने कन्वेयर बेल्ट, डस्ट रिमुवल मशीन, सक्शन वाहन, शेडिंग मशीन, स्क्रिनिंग मशीन आदी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. या उपकरणांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक यांच्या उपस्थित पार पडला. 

 यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले शहराचा विस्तार होत असताना इमारती, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सांडपाणी, मैलापाणी तसेच स्वच्छतेशी संबंधित कामांसाठी सक्शन वाहनाची गरज सातत्याने भासत होती. तसेच अत्यावश्यक असलेली अन्य उपकरणे नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेत आणत आहोत. सक्शन व्हॅनची अत्यावश्यकता होती, ती आज नगरपंचायतीने पूर्ण केली असून शहरासाठी याची सुविधा कमी दरात उपलब्ध करून दिली जाईल. नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. या कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन, वर्गीकरण व विल्हेवाट लावल्यास त्यातून उपयुक्त वस्तू अथवा संसाधने निर्माण करता येऊ शकतात. यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता केली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. कचरा केवळ समस्या न राहता त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून काहीतरी चांगले निर्माण होऊ शकते. यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे नगरपंचायतीने उपलब्ध केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी कन्वेयर बेल्ट, स्क्रिनिंग मशीन आणि शेडिंग मशीन यांसारख्या उपकरणांचा उपयोग होणार आहे. डस्ट रिमुवल यंत्रणेमुळे स्वच्छता प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारी धूळ कमी करण्यास मदत होणार आहे. या सर्व यंत्रसामग्रीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती मिळण्याबरोबरच कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. उपनगराध्यक्ष, सहकारी नगरसेवक, नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही कामे शक्य झाली आहेत. शहराच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी नगरपंचायतीच्या माध्यमातून जी सक्शन व्हॅन आणली होती ती शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अयोग्य होती. ती ऑपरेट होत नव्हती, सक्शन पंप ट्रॅक्टरला जॉइंट करून  तो फिरण्यासाठी मोटर लावण्यात आली होती. अशा बऱ्याच त्रुटी पूर्वी खरेदी केलेल्या सक्शन व्हॅन मध्ये होत्या. ती सक्शन व्हॅन सध्या डंपिंग ग्राऊंडवर तशीच पडून आहे. टेक्निशियन यांना आणून त्या व्हॅन बाबत सल्ले घेतले असता ती शहरात फिरवण्यासाठी निरुपयोगी असल्याचे समोर आले. तद्नंतर, स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली. आणि, नव्याने दुसरी सक्शन व्हॅन आपल्या नगरपंचायत त्वरित भेटली त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. तसेच, शहराच्या अनुषंगाने सक्शन व्हॅन आणणे गरजेचे असताना उपयोगात न येणारी सक्शन व्हॅन त्यावेळी का आणण्यात आली, याची चौकशी करून त्यावेळी पदावर असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.