LIVE UPDATES

उभादांडा येथील कांदळवन क्षेत्रात स्वच्छता कार्यक्रम

जागतिक कांदळवन संवर्धन दिनानिमित्त उप्रक्रमाचे आयोजन : वनाधिकारी, विद्यार्थ्यांचा सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 27, 2026 18:55 PM
views 10  views

सिंधुदुर्ग : विभागीय वनाधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण अलिबाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली  "जागतिक कांदळवन संवर्धन दिन" चे औचित्य साधून मौजे उभादांडा येथील मानसीश्वर देवस्थान नजीकच्या कांदळवन क्षेत्रात श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या  प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.

तसेच मांडवी खाडी वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांसोबत कांदळवन ट्रेल आयोजित करण्यात आली. याठिकाणी परिमंडळ वनाधिकारी सुनील सावंत यांनी जागतिक कांदळवन संवर्धन दिनाच्या अनुषंगाने खाडी क्षेत्रात आढळणारे कांदळवनाचे पर्यावरणातील महत्त्व, कांदळवनाचे महत्त्व, कांदळवनाला असणारे धोके आणि नियम याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले व कांदळवाचे संवर्धन व संरक्षणाचे आवाहन केले. तसेच कांदळवन ट्रेलच्या माध्यमातून स्वामिनी महिला बचत गटातील सदस्यांनी कांदळवन व पक्षी प्रजाती, तसेच त्यांचे आयुर्वेदिक उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे प्रा.डॉ. गणेश  मर्गज, डॉ. शलाका वालावलकर,  प्रा. तन्वी नाईक, प्रा. श्वेता जाधव, प्राणीशास्राचे विद्यार्थी, तसेच कांदळवन प्रतिष्ठानचे, वनरक्षक अजित भोसले, वनमजूर गौरेश खडपवर, कांदळवन प्रतिष्ठान व यु. एन. डी. पी. (जी. सी. एफ) प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर, जागृती गवंडे, सौरभ राऊळ, शुभम कांबळे, युगंधरा कांबळे, सुकृती नाईक आदी उपस्थित होते.

 स्वामिनी महिला गटाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती त्यांचे उपयोग व त्यांचे महत्त्व या संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी परिमंडल वनाधिकारी सुनील सावंत यांनी कांदळवन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कांदळवन यांचा विस्तार उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशापुरता मर्यादित असून जगभरात 118 देशांमध्ये 1,37,766 चौरस किलोमीटर क्षेत्रात ती आढळतात. जगाच्या एकूण किनारपट्टीच्या अंदाजे एक चतुर्थांश भागामध्ये कांदळवन परिसंस्था अधिवास आहे. भारत आणि बांगलादेशाचा भूभागात सलग पसरलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे एकसंघ कांदळवन असून हे साधारणतः 5800 चौरस किलोमीटर पसरलेले आहे.  यापैकी सुमारे 3700 चौरस किलोमीटर क्षेत्र बांगलादेशात तर 2l00 चौरस किलोमीटर क्षेत्र भारताने व्यापलेले आहे.

2021 च्या भारतीय वन सर्वेक्षणानुसार भारतातील कांदळवनाखालील एकूण जमीन साधारण 4,992 चौरस किलोमीटर असून ती सर्व किनारपट्टी च्या राज्यात विभागली गेलेली आहे.यापैकी 69 टक्के पूर्व किनाऱ्यावर तर 31 टक्के पश्चिम किनाऱ्यावर आहे. पश्चिम किनाऱ्यालगत कांदळवन क्षेत्रात गुजरात राज्याचा सर्वाधिक ११७६ चौरस किलोमीटरवर महाराष्ट्रात 324 चौरस किलोमीटर वाटा आहे.निरोगी पर्यावरणासाठी कांदळवनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्सुनामी,चक्रीवादळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे आघात झेलून संरक्षण करण्यास कांदळवन समर्थ असतात. मातीची धूप होऊ देत नाही. भारतात खारफुटीच्या एकूण 44 प्रजाती व सहचर वनस्पती 86 आहेत. समुदात असलेले मासे पोषण आणि प्रजननासाठी

 कांदळवनावर अवलंबून असतात.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 17 प्रजातींची कांदळवन वृक्ष आढळतात. पांढरी चीपी हा कांदळ वृक्ष राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केला आहे. तो वेंगुर्ला तालुक्यात चीपी या ठिकाणी आढळतो. कांदळ वनांना खाजण वन,खारफुटी वन,चीपी वने म्हणून ओळखले जाते.राज्यात सुमारे 150.88 चौरस किलोमीटर कांदळवने राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आली आहेत ही माहिती दिली. कांदळवन विभागाच्या वतीने 22 जुलै रोजी मौजे दाभोळी वांगणी येथील किनारपट्टी परिसरात सागरी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.

सदर समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक काचेच्या बाटल्या इतर टाकाऊ वस्तु मिळून सदर परिसरामध्ये सुमारे 800 किलो कचरा गोळा करण्यात आला यामध्ये दाभोली ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले होते. त्याचबरोबर श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय चंदन येथे 23 जुलै रोजी कांदळवन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर रामेश्वर माध्यमिक विद्यालय पाव येथे कांदळवन संवर्धन आणि जनजागृती जागृती विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 24 जुलै रोजी अरुंद हायस्कूल आरोंदा येथे प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक कांदळवन संवर्धन उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. 24 जुलै रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल उभा दांडा येथे कांदळवन जनजागृती कार्यक्रम कांदळवन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . यावेळी प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कांदळवन विभाग परिमंडळ वेंगुर्ला च्या वतीने गेले वर्षभर कासव संवर्धन, वेंगुर्ला रॉक्स येथील पाकोळी संवर्धन व कांदळवन संवर्धन या महत्त्वाच्या विषयावर विविध माध्यमातून जनजागृती चे काम केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाळांची बेटे व कांदळवणे संवर्धित करणे ही आजच्या काळाची गरज आहे कारण प्रवाळे व कांदळ वने ही माशांची पैदास केंद्रे आहेत त्याला जपायला हवे तरच सिंधुदुर्ग  जिल्ह्याची मत्स्यसंपदा अभाधित राहील अन्यथा मत्स्य दुष्काळ निर्माण होईल व कांदळवने नसल्यास अनेक नैसर्गिक आपत्ती फार मोठ्या प्रमाणात विघातक  ठरू शकतात हे या कार्यक्रमामुळे अधोरेखित करण्यात आले.