LIVE UPDATES

घोटगेत सहा हत्तींच्या कळपाकडून फळबागेचे नुकसान

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 27, 2026 19:32 PM
views 20  views

दोडामार्ग : घोटगे परिसरात हत्तींच्या कळपाने पुन्हा धुमाकूळ घातला असून शेतकरी संतोष दळवी यांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सहा हत्तींचा कळप दळवी यांच्या बागेत व परिसरात वावरत असून बांबू, नारळ, सुपारी, विविध फळझाडे तसेच इतर लागवडींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जंगली हत्तींचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार हत्तींच्या हल्ल्यांमुळे बागायती शेतीचे मोठे नुकसान होत असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नुकसानभरपाईची रक्कमही प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची तक्रार शेतकरी सातत्याने करत आहेत. सध्या घोटगे, मोर्ले आणि घोटगेवाडी परिसरात सहा हत्तींचा कळप वावरत आहे. या कळपाने संतोष दळवी यांच्या फळबागेत घुसून अनेक झाडे उन्मळून टाकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील व वनपाल गिते यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस उपस्थित होते. स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.

मेहनतीने उभी केलेली बाग पुन्हा उद्ध्वस्त : संतोष दळवी

अनेक वर्षे कष्ट करून आणि लाखो रुपये खर्चून मी नारळ, सुपारी, सागवान, बांबू तसेच विविध फळझाडांची लागवड केली. बाग आता उत्पादनाच्या टप्प्यात आली असतानाच हत्तींच्या कळपाने पुन्हा मोठे नुकसान केले. गेल्या वर्षीही सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, अनेक झाडांचा भरपाईच्या निकषात समावेश नसल्याने अपेक्षित नुकसान भरपाई मिळाली नाही. आता पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेती करायची तरी कशी असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे, अशी व्यथा संतोष दळवी यांनी व्यक्त केली.