
राजापूर : ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे मंगळवारी ९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी तीन सिझेरियन प्रसूती यशस्वीरीत्या करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या इतिहासात एकाच दिवशी प्रथमच तीन सिझेरियन प्रसूती झाल्याने ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
याच दिवशी एका रुग्णावर गर्भपिशवी स्वच्छ करण्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. तसेच २० गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकाच दिवशी ग्रामीण रुग्णालयात विविध वैद्यकीय सेवांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले.
या सर्व शस्त्रक्रिया व वैद्यकीय सेवांमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सोनोलॉजिस्ट तसेच सर्जन म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. भूलतज्ज्ञ म्हणून रत्नागिरी येथील डॉ. दत्तप्रसाद केतकर यांनी काम पाहिले, तर बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. उमेश चव्हाण यांनी आपली सेवा बजावली.
या यशस्वी वैद्यकीय कार्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्गाचा मोलाचा सहभाग होता. डॉ. आर्यन, डॉ. हर्षानी, डॉ. स्नेहल आणि डॉ. प्रसन्ना यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेत सहकार्य केले. तसेच स्टाफ नर्स बोरकर, लांजेकर, राठोड, महाडीक आणि चव्हाण, ब्रदर नाटेकर तसेच कर्मचारी प्रशांत, निशांत, चव्हाण आणि नाखरेकर माई यांनीही या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
डॉ. राम मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण टीमने समन्वयाने काम करत सर्व शस्त्रक्रिया व वैद्यकीय सेवा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार व तातडीच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, राजापूरची ही कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरत आहे.










