
सिंधुदुर्ग : विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत स्वतः जागरूक राहून समाजात जनजागृती केल्यास त्याचे मोलाचे परिणाम दिसून येतील, असे प्रतिपादन महामार्ग पोलीस मदत केंद्र, कसालचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी केले. फोंडा ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा'त ते मार्गदर्शन करत होते.
श्री पाटील ,यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे तसेच मुला-मुलींच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. आधुनिक युगात अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक श्री फाले, यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, विविध फसव्या आमिषांपासून दूर राहण्याची आवश्यकता तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांनी शिस्तबद्ध जीवन, वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व विशद केले. दुचाकी चालविताना स्टंटबाजी व अतिवेग टाळण्याचे आवाहन करत, वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.










