LIVE UPDATES

मोर्लेतील बीएसएनएल नेटवर्क सेवा अखेर सुरळीत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 19:20 PM
views 178  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : मोर्ले गावातील बीएसएनएल  टॉवरच्या बॅटऱ्या खराब झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली दूरसंचार सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामस्थ, BSNL कर्मचारी आणि स्थानिक युवकांच्या सहकार्याने टॉवरसाठी आवश्यक असलेल्या नवीन बॅटऱ्या आज टॉवरवर बसविण्यात आल्या. त्यामुळे मोर्लेसह परिसरातील तब्बल बारा गावांचा दूरध्वनी व मोबाईल नेटवर्कचा संपर्क पुन्हा सुरळीत झाला आहे.

    मोर्ले येथील बीएसएनएल  टॉवर हा केबल टॉवर असून तो परिसरातील अनेक सॅटेलाइट टॉवरशी जोडलेला आहे. त्यामुळे मोर्ले टॉवर बंद पडल्यास भेकुर्ली, तिराळी आणि शिरंगे पुनर्वसन येथील टॉवरची सेवाही प्रभावित होते. प्रत्येक टॉवरवर सुमारे चार गाव अवलंबून असल्याने मोर्ले टॉवर बंद पडल्यास तब्बल बारा गावांचा संपर्क तुटतो. विशेषतः पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बॅकअप उपलब्ध नसल्याने ही समस्या दरवर्षी गंभीर होत होती.

ही बाब लक्षात घेऊन मोर्ले गावचे उपसरपंच तथा शिवसेना उ.बा.ठा. विभागप्रमुख संतोष मोर्ये आणि गोपाळ गवस यांनी संबंधित BSNL विभागाकडे टॉवरसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची मागणी केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर BSNL विभागाकडून आवश्यक बॅटऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

BSNLकडून बॅटऱ्या उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या मोर्ले टॉवरपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान होते. टॉवर अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम भागात असल्याने तेथे वाहन पोहोचणे जवळपास अशक्य आहे. मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

घोटगेवाडी येथील युवक आप्पा पनवेलकर आणि कमलेश परीट यांनी स्वतःची फोर-बाय-फोर जीप उपलब्ध करून देत बॅटऱ्या टॉवरच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी मोठी मेहनत घेतली. अत्यंत अवघड आणि धोकादायक मार्गावरून तारेवरची कसरत करत त्यांनी बॅटऱ्या टॉवरपर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर ग्रामस्थ आणि BSNL कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बॅटऱ्या टॉवरवर बसविण्यात आल्या.

बॅटऱ्या कार्यान्वित होताच मोर्लेसह परिसरातील गावांचा नेटवर्क संपर्क पूर्ववत झाला. त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत तसेच दैनंदिन संपर्कासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामासाठी मोर्ले गावचे उपसरपंच संतोष मोर्ये, नीलेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य केर, आप्पा पनवेलकर, कमलेश परीट, पंकज देसाई, उमेश चिरमुरे, मंगेश गवस, अजित गवस, विशाल पारधी, संकेत कुठवळकर, अनाजी देसाई यांच्यासह ग्रामस्थ आणि BSNL कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.दुर्गम भागातील बारा गावांचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट आणि युवकांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरत असून, या कार्याबद्दल परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

डोंगराळ भागातील टॉवरपर्यंत वाहन नेणे अत्यंत कठीण असतानाही घोटगेवाडी येथील युवक आप्पा पनवेलकर व कमलेश परीट यांनी स्वतःची फोर-बाय-फोर जीप घेऊन बॅटऱ्या टॉवरपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे आजूबाजूच्या गावांतील नागरिकांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.