
कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावरील माड्याचीवाडी-करमळगाळू पापडी येथील कॉजवे खचल्याने एका बाजूला भले मोठे भगदाड पडले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप या ठिकाणी कोणतीही उपाययोजना किंवा वाहनधारकांसाठी धोक्याचा सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावर कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी भगदाड पडण्याचे प्रकार घडतात; परंतु स्थानिक पातळीवरून सातत्याने मागणी होत नसल्याचा गैरफायदा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप होत आहे. यंदाही त्याच जागी पुन्हा मोठे भगदाड पडल्याने कॉजवेचा उर्वरित भाग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. हे भगदाड तात्काळ बुजवून रस्ता सुस्थितीत करावा, अशी जोरदार मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
पिंगुळी-पाट रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. परुळे-चिपी विमानतळाकडे जाणारा, तसेच खवणे आणि निवती या प्रसिद्ध समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दिवस-रात्र एसटी बस, अवजड वाहने आणि पर्यटकांच्या गाड्यांची मोठी वर्दळ असते. कॉजवे खचल्यामुळे अवजड वाहतुकीच्या भाराने उर्वरित भागही कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळी या भगदाडाचा अंदाज न आल्यास विशेषतः दुचाकी व वाहनधारकांसाठी हा मार्ग अत्यंत जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाचे लक्ष नसल्याने अखेर स्थानिक ग्रामस्थांनीच प्रसंगावधान राखून वाहनधारकांना पूर्वकल्पना मिळावी यासाठी भगदाडाच्या ठिकाणी झाडांच्या फांद्या आणून ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत वाहनधारक एकाच बाजूने वाहतूक करत आहेत.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन या ठिकाणी तात्काळ सूचना फलक लावावेत आणि कॉजवेची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांमधून होत आहे.










