
कुडाळ : 'नीट' परीक्षा पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना आणि जंतरमंतरवरील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने कुडाळ तालुक्यात मंगळवारी एक महत्त्वपूर्ण मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भारताच्या अखंडतेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षा पेपर फुटी हा विषय अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली.
या आंदोलनादरम्यान बोलताना प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले की, परीक्षा पेपर फुटी प्रकरण किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाशी किंवा विरोधी पक्षाशी निगडित नसून तेथील तरुण पिढीच्या म्हणजेच राष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाशी जोडलेले आहेत. विद्यार्थ्यांना सनदशील मार्गाने न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पाठीशी खरोखरच न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील विषयाच्या आडोशाने काही जण मोठे राजकारण करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांच्या आड येऊन देशात काही विरोधक जाणीवपूर्वक अराजकता पसरवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप प्रभाकर सावंत यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मोर्चाचा आणि वेदनेचा गैरफायदा घेऊन काही वाईट शक्ती स्वतःचे उदातीकरण करण्यात व्यस्त आहेत. देशाची स्थिती नेपाळसारखी करण्याचा काहींचा मनसुबा असून, अशा शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सावंत म्हणाले की, कोरोनासारख्या जागतिक महामंदी आणि संकट काळातही १५० कोटींचा हा विशाल देश पंतप्रधान मोदींनी अत्यंत समर्थपणे आणि यशस्वीरीत्या हाताळला. देशातील युवकांना 'विकसित भारताचे' सुंदर स्वप्न दाखवून त्या दिशेने देशाला नेण्याचे प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. अलीकडच्या काळात इराण युद्धासारखी आंतरराष्ट्रीय संकटे आली असतानाही भारताचे अंतर्गत वातावरण बिघडले नाही, हे त्यांच्या कणखर नेतृत्वाचेच फलित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणीही अपमानास्पद किंवा वाईट वक्तव्य करत असेल, तर ते भाजप आणि देशातील जनता कधीही सहन करणार नाही आणि अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला.युवकांना न्याय देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या किंवा नेपाळसारखी स्थिती निर्माण करू पाहणाऱ्या कृत्यांविरोधात मोदी सरकार जे काही कठोर निर्णय घेईल, त्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी भाजपचे कार्यकर्ते आणि संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा राहील, असे स्पष्ट करत याच भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आज कुडाळमध्ये ही मानवी साखळी साकारण्यात आल्याचे प्रभाकर सावंत यांनी शेवटी सांगितले.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, संजय वेंगुर्लेकर, सीताराम तेली,बंड्या सावंत,निलेश परब, पप्या तवटे सह असंख्य पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.










