
कुडाळ : हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्या परिचारिकांमधील 'प्लांटर फॅशायटिस' या टाचदुखीच्या विकारावर क्लिनिकमध्ये न जाता घरातूनच केलेले दूरस्थ उपचार (टेलिरिहॅबिलिटेशन) अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेले हे संशोधन 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी टेक्नॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
६० परिचारिकांवर ६ आठवडे केलेल्या या अभ्यासात थेट 'झूम' (Zoom) व्हिडिओ सत्रे आणि 'माहितीपत्रक' (ब्रोशर) अशा दोन्ही पद्धतींनी दिलेले व्यायाम टाचदुखी कमी करण्यात यशस्वी ठरले. 'झूम' गटातील वेदना गुणांक ५.३३ वरून १.६३, तर माहितीपत्रक गटातील गुणांक ५.७७ वरून २.५३ पर्यंत खाली आला.
डिजिटल आरोग्य सुविधांमुळे रुग्णांचा वेळ व प्रवास खर्च वाचणार असून प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये जाणे अशक्य असलेल्यांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरेल. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर यांनी डॉ. बिस्वाल व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.












