
सावंतवाडी : नगरपालिकेच्या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या शहरातील अधिकृत स्टॉलधारकांनी पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आम्ही बेरोजगार असल्याने या स्टॉलच्या माध्यमातूनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. शहरात इतरही अनेक दुकाने असताना केवळ आमच्यावरच ही कारवाई का? हा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न असून आमच्या पोटावर पाय आणू नका, अशी विनंती या विस्थापित स्टॉलधारकांनी केली.
स्टॉलधारकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी त्यांना दिलासा दिला. आम्ही जनतेतून निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका लवकरच एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. जे फिरते स्टॉल आहेत किंवा संध्याकाळच्या वेळी व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी 'खाऊ गल्ली' उभारून तिथे त्यांची व्यवस्था करण्याचा विचार आहे. हा विषय आधीच कौन्सिल बैठकीत मांडण्यात आला आहे. तसेच, ज्या स्टॉलधारकांचे स्टॉल नगरपालिकेच्या ताब्यात आहेत, त्यांनी ते परत मिळण्यासाठी पालिकेकडे रीतसर अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोणाचेही नुकसान होऊ न देता लवकरात लवकर योग्य मार्ग काढू, असा शब्द सभापती सौ. मडगावकर यांनी स्टॉलधारकांना दिला.










