LIVE UPDATES

आदिशक्ती प्रदर्शनाला अनुराधा नारकर यांची भेट

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारा उपक्रम कौतुकास्पद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 26, 2026 12:04 PM
views 102  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : तालुका महिला व्यापारी संघाच्या वतीने देवगडमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती प्रदर्शन व विक्री’ महोत्सवाला जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देत वस्तूंची खरेदीही केली.

यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, पंचायत समिती सदस्या समृद्धी चव्हाण आदी उपस्थित होत्या.

महिला उद्योजिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आदिशक्ती’सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरत आहे. या उपक्रमामुळे महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळत असून, स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच महिला सक्षमीकरणालाही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे अनुराधा नारकर यांनी यावेळी सांगितले.

डायमंड हॉटेलमागील इंद्रप्रस्थ हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल, दिवाळी फराळ, विविध प्रकारची पिठे, लोणची व अन्य घरगुती खाद्यपदार्थ, वस्त्रदालने, दागिने, आकाशकंदील, दिवाळी साहित्य तसेच विविध हस्तकला वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते.

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध झाल्याने या प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाला ओळख मिळवून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.