
कुडाळ : भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे औचित्य साधून, भ्रष्टाचारमुक्त देश व महाराष्ट्र घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सिंधुदुर्ग यांच्या वतीने आवळेगाव येथे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. 'सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे' या यंदाच्या संकल्पनेवर आधारित या रॅलीला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
ही जनजागृती रॅली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग, आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय आवळेगाव तसेच सिग्मा करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. यामध्ये विद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन व उपस्थिती
या कार्यक्रमादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅलीला संबोधित केले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनामध्ये आवळेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक दशरथ काळे, शिक्षक श्री. धुमाळे, श्री. पालव, श्री. कांबळे, लिपिक वेदांश सावंत, तसेच सिग्मा करिअर अकॅडमीचे संचालक संदेश ठाकूर, सविता पाताडे आणि क्रीडा शिक्षक श्री. राहुल यांनी विशेष सहभाग नोंदवला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिनांक २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे.
रॅलीमधील फलक आणि मार्गदर्शनाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, "आपली सत्यनिष्ठा हीच आपल्या समृद्ध समाजाची खरी ताकद आहे." त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
कोणत्याही प्रकारच्या लाचेच्या तक्रारीसाठी वा संशयास्पद माहितीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याशी टोल फ्री क्रमांक: १०६४ (1064), कार्यालयीन संपर्क क्रमांक: ०२३६२ - २२२२८९, व्हॉट्सॲप क्रमांक: ९९२२८९१०६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








