
सावंतवाडी : तालुक्यातील महत्त्वाचे आणि मोठे महसुली गाव म्हणून ओळख असलेल्या माजगाव येथील तलाठी कार्यालय गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी कार्यरत आहे. कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून या अन्यायाविरोधात आता माजगाववासीय आक्रमक झाले आहेत. येत्या ८ दिवसांत कायमस्वरूपी तलाठी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे.
माजगाव हे गाव महसूल उत्पन्नाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहे. मात्र, दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पूर्णवेळ तलाठी उपलब्ध नाही. सध्या अन्य ठिकाणच्या तलाठ्यांकडे या गावाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रभारी तलाठी ठराविक वेळेत उपलब्ध होत नसल्याने सातबारा उतारे, वारस नोंद, फेरफार आणि विविध शासकीय दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. गावात तलाठी वेळेवर भेटत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली कामे करून घेण्यासाठी स्वतःच्या खर्चाने सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात जावे लागते. मजुरी सोडून आणि खिशातून पैसे खर्च करूनही कामे वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सामान्य शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत असताना दुसरीकडे जमिनींच्या खरेदीखतांचे व्यवहार मात्र जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप बाबू सावंत यांनी केला आहे.माजगाव तलाठी कार्यालयातील सावळागोंधळ इतक्यावरच थांबत नसून या गावासाठी नियुक्त असलेले कोतवाल हे गावात राहण्याऐवजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्यालयात साधी चौकशी करण्यासाठीही कोणाचे पाठबळ उरलेले नाही. गावचा महसूल कर्मचारीच गावात नसेल, तर सामान्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल बाबू सावंत यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर बाबू सावंत यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, जोपर्यंत कायमस्वरूपी तलाठी माजगावला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तलाठी कार्यालय उघडू देणार नाही. लोकप्रतिनिधींनी या विषयात तात्काळ लक्ष घालून आठ दिवसांच्या आत तलाठ्याची नियुक्ती करावी. अन्यथा, ८ दिवसांत ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.










