LIVE UPDATES

मळेवाड - शिरोडा मार्गावरील झाडी आणि अंधारामुळे अपघातांचा धोका

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी : प्रथमेश परब
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 23, 2026 13:55 PM
views 90  views

वेंगुर्ला : मळेवाड ते शिरोडा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, या मार्गावर अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच संपूर्ण मार्गावर पुरेशा पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.

गोवा येथून कामानिमित्त तसेच इतर कारणांसाठी ये-जा करणारे अनेक तरुण रात्रीच्या वेळी या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्यालगत वाढलेली झाडी आणि अंधारामुळे वाहनचालकांना समोरील रस्ता, वळणे तसेच येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मळेवाड ते शिरोडा मार्गावरील वाढलेली झाडी हटवावी तसेच आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवावेत, अशी मागणी वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊन चालणार नाही. वारंवार अपघात होण्याची वाट न पाहता या मार्गावरील झाडी हटविणे आणि प्रकाशव्यवस्था करणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परब यांनी केली आहे.  नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने लवकरात लवकर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.