
दोडामार्ग : साटेली-भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात मंगळवारी सरपंच यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतची नोटीस त्यांनी तहसीलदार राहुल गुरव यांना मंगळवारी दिली असून उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होण्याची या ग्रामपंचायत मधील पहिलीच वेळ आहे.
दाखल केलेल्या अर्जावर सरपंच छाया धर्णे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मयेकर, विष्णू सुतार, सेजल धर्णे, दिपाली मोरजकर, शोभना जुवेकर, संपदा गवस, नीलपर्णा पार्सेकर, गणपत डांगी यांच्या सह्या आहेत. दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून साटेली- भेडशी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. राजकियदृष्ट्या या ग्रामपंचायतीचे महत्व फार मोठे असून अकरा सदस्य असलेली ही ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे संवेदनशीलरित्या पाहिले जाते. आज या ग्रामपंचायत क्षेत्रात झपाट्याने नागरी विस्तार होत आहे.
आता तर येथील उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केल्याने ही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत आली आहे. उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. ते मनमानी कारभार करतात. सरपंच इतर सदस्यांबद्दल गैरसमज पसरवणे, विकासकामात अडथळे निर्माण करणे असे आरोप उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर केले आहेत.










