
खारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे व्यापारी, ग्राहक तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, बाजारपेठेतील डांबरी रस्त्यालगत गटार नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे माती रस्त्यावर येते . मात्र ,अचानक आलेल्या पावसामुळे हीच माती संपूर्ण अन्य रस्त्यांवर पसरली आणि चिखलात रूपांतरित झाली असून, रस्त्यावरून चालणेही नागरिकांसाठी कठीण बनले आहे. त्यामुळे हा रस्ता कधी होणार असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर यांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे, तर पायी चालणाऱ्या नागरिकांनाही चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढण्याची शक्यता असताना रस्त्याची ही अवस्था व्यापाऱ्यांसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी यायचे की चिखलातून वाट काढायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खारेपाटण बाजारपेठेला अद्याप सुसज्ज आणि दर्जेदार डांबरी रस्ता मिळालेला नाही. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्यासाठी माती टाकण्याऐवजी कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था का केली जात नाही? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने आता तरी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन खारेपाटण बाजारपेठेतील रस्त्याची कायमस्वरूपी सुधारणा करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे. विकासाच्या घोषणा होत असताना बाजारपेठेतील मूलभूत रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








