
देवगड : देवगडच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एका अभिनव आकर्षणाची भर पडली असून, ‘सेल्फी संग्रहालय – देवगड’ या अनोख्या पर्यटन उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मंत्री तथा स्थानिक आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. फ्लाइंग कोकण एलएलपीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे देवगडच्या पर्यटनाला आधुनिक मनोरंजनाची आणि छायाचित्र अनुभवाची नवी जोड मिळाली आहे.
पर्यटकांनी केवळ पर्यटनस्थळ पाहून परत न जाता, त्या ठिकाणच्या आठवणी छायाचित्रे व चित्रफितींच्या माध्यमातून जपाव्यात, त्या समाजमाध्यमांवर शेअर कराव्यात आणि प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन अनुभव घ्यावा, या उद्देशाने सेल्फी संग्रहालयाची संकल्पना साकारण्यात आली आहे. देवगडचा किल्ला, समुद्रकिनारा, हापूस आंबा आणि निसर्गरम्य परिसर यांसोबतच पर्यटकांना आता आकर्षक पार्श्वभूमी, विविध संकल्पनांवरील सजावट, छायाचित्रांसाठी विशेष जागा आणि विविध साधनांचा अनुभव घेता येणार आहे.
सेल्फी संग्रहालयाची संकल्पना आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी या उपक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीवर विशेष भर दिला. “या प्रकल्पाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा. समाजमाध्यमे तसेच पारंपरिक माध्यमे अशा दोन्ही माध्यमांतून प्रभावी प्रचार झाला पाहिजे. मोक्याच्या ठिकाणी या प्रकल्पाची माहिती देणारे फलक उभारल्यास अधिकाधिक पर्यटक आणि नागरिकांपर्यंत सेल्फी संग्रहालयाची माहिती पोहोचेल,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या मार्गदर्शनानुसार समाजमाध्यमे, डिजिटल प्रचार, पर्यटनस्थळांवरील प्रसिद्धी, प्रमुख मार्गांवरील फलक तसेच विविध पारंपरिक माध्यमांतून सेल्फी संग्रहालयाची व्यापक प्रसिद्धी करण्याचा ‘फ्लाइंग कोकण’चा मानस आहे. विशेष म्हणजे, या संग्रहालयातील पार्श्वभूमी, संकल्पना, सजावट आणि छायाचित्रांसाठीची जागा वेळोवेळी बदलण्यात येणार असल्याने पर्यटकांना प्रत्येक भेटीत नवा अनुभव मिळणार आहे.
या उपक्रमामागील संकल्पना मांडणारे श्रीकांत जोईल यांनी सांगितले की, “आजच्या काळात पर्यटक एखाद्या ठिकाणी जाताना तेथील अनुभव आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून तो अनुभव हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. याच गोष्टीचा पर्यटनाच्या दृष्टीने सकारात्मक उपयोग करून देवगडला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
‘फ्लाइंग कोकण’ यापूर्वी देवगडमधील दोरावरून साहसी प्रवासाच्या उपक्रमाद्वारे साहसी पर्यटनाला चालना देत आहे. आता सेल्फी संग्रहालयाच्या माध्यमातून कुटुंबे, युवा वर्ग, मुले, पर्यटक तसेच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या छायाचित्रकार व चित्रनिर्मात्यांसाठी आणखी एक आकर्षण उपलब्ध झाले आहे. साहसी पर्यटन, सेल्फी संग्रहालय, देवगडची पर्यटनस्थळे आणि कोकणी खाद्यसंस्कृती असा सर्वसमावेशक पर्यटन अनुभव पर्यटकांना देण्याच्या दिशेने भविष्यात आणखी उपक्रम राबविण्याचा ‘फ्लाइंग कोकण’चा प्रयत्न आहे.
या नव्या उपक्रमामुळे देवगडमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासोबतच स्थानिक हॉटेल्स, उपाहारगृहे, दुकानदार, वाहतूक व्यावसायिक, छायाचित्रकार आणि अन्य पर्यटनपूरक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्याची शक्यता आहे.
“देवगड हे केवळ आंबा किंवा समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाऊ नये, तर निसर्ग, साहस, मनोरंजन आणि नवीन अनुभवांचे पर्यटनस्थळ म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी,” ही ‘फ्लाइंग कोकण’ची संकल्पना असल्याचे श्रीकांत जोईल यांनी स्पष्ट केले. सेल्फी संग्रहालयाच्या माध्यमातून देवगडच्या पर्यटनाला मिळालेली ही नवी झळाळी आगामी काळात पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.










