LIVE UPDATES

संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराचे अटलचे कार्य कौतुकास्पद

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे प्रतिपादन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 30, 2026 18:27 PM
views 115  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : संस्कृत ही अतिप्राचीन आणि समृद्ध भाषा असून, आजच्या डिजिटल युगातही या भाषेला विशेष महत्त्व आहे. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अटल प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे, हे कौतुकास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी केले.

अटल प्रतिष्ठानतर्फे आयोजित तसेच स्व. महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ डॉ. अमोल पावसकर व डॉ. नितीन पावसकर यांनी प्रायोजित केलेल्या संस्कृत भाषेतील विविध स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, अटल प्रतिष्ठान गेली २० वर्षे संस्कृत भाषेचा जागर करीत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती विविध उपक्रमांच्या माध्यमातून जपण्याचे काम प्रतिष्ठान करीत असून, समाजातील विविध घटकांचे सहकार्य व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धेचे प्रायोजक व कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. संस्कृत ही जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध व वैज्ञानिक रचना असलेली भाषा असून, तत्त्वज्ञान आणि ज्ञानाचा मोठा ठेवा या भाषेत सामावलेला आहे. संगणकीय प्रणालीसाठीही संस्कृत भाषा उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शैलेश पई यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका व परीक्षक श्रीमती सुलभा कशाळीकर यांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासामुळे उच्चार स्पष्ट होण्यास, मानसिक एकाग्रता वाढण्यास तसेच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते, असे सांगितले.

या स्पर्धेत जिल्हाभरातील ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तीन शालेय गटांमध्ये झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

गट १ : इयत्ता पाचवी ते सहावी — श्लोकपठन

प्रथम : कु. स्वानंदी प्रवीण कुबल — एस.एम. हायस्कूल, कणकवली

द्वितीय : कु. खुशी गंगाराम परब — एस.एम. हायस्कूल, कणकवली

तृतीय : कु. श्रीषा मिहीर प्रभुदेसाई — राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी

उत्तेजनार्थ : कु. दीक्षा होडावडेकर — नेमळे हायस्कूल, नेमळे

गट २ : इयत्ता सातवी ते आठवी — संस्कृत गीतगायन

प्रथम : कु. पद्मज योगेश महाडिक — एस.एम. हायस्कूल, कणकवली

द्वितीय : कु. स्वराज साईकृष्ण कांदे — नेमळे हायस्कूल, नेमळे

तृतीय : कु. सारंगी सचिन राऊळ — बांदा हायस्कूल, बांदा

उत्तेजनार्थ : कु. सिद्धी सुनील राऊळ — मळगाव हायस्कूल

गट ३ : इयत्ता नववी ते दहावी — कथाकथन

प्रथम : कु. आर्य दीनानाथ माणगावकर — वासुदेवानंद सरस्वती विद्यामंदिर, माणगाव

द्वितीय : कु. वेदांती दयानंद लाड — वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव

तृतीय : कु. गार्गी कांचन काजरेकर — एस.एम. हायस्कूल, कणकवली

उत्तेजनार्थ : कु. वैभवी गोविंद परब — राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी

यशस्वी स्पर्धकांना युवा सामाजिक कार्यकर्ते व अटल प्रतिष्ठानचे कायम निमंत्रित सदस्य श्री. बाबा टोपले आणि पत्रकार श्री. विनायक गावसं यांच्या हस्ते बांबूपासून तयार केलेली आकर्षक स्मृतिचिन्हे व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून श्रीमती सुलभा कशाळीकर व सौ. वृंदा काजरेकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अटल प्रतिष्ठानच्या खजिनदार व समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे यांनी केले, तर आभार अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. रघुनाथ तानावडे यांनी मानले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. राजाराम पार्सेकर, संस्कृतच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. तृप्ती पार्सेकर व कार्यालयीन प्रमुख कु. ज्योती राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी सौ. सुस्मिता चव्हाण, सौ. भारती पावसकर, श्री. देसाई, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.