LIVE UPDATES

गळाला मासा अन् देवगडच्या पर्यटनाला नवी दिशा !

मिठमुंबरीत तालुक्यातील पहिल्याच फिशिंग टूर्नामेंटचा थरार; ‘देवगडचे नाव जगाच्या पाठीवर घेऊन चला’ पालकमंत्री नितेश राणे यांचे तरुणांना आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 30, 2026 18:39 PM
views 522  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : देवगड स्पोर्टस् क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करताना स्थानिक तरुण आणि मच्छीमार समाजासाठी मोठ्या व्यासपीठाची गरज व्यक्त केली. “विविध माध्यमातून स्थानिक तरुण आणि मच्छीमारांसाठी मोठ्यात मोठे व्यासपीठ देवगड स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून तयार करा. ते उपलब्ध करून द्या. केवळ शुभेच्छा देण्यासाठी नाही, तर देवगड स्पोर्टस् क्लबच्या मागे भक्कम भिंत उभी आहे, हे सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत उभे आहोत.”देवगड स्पोर्टस् क्लब आणि देवगड युथ फोरम यांच्यात युती-आघाडी झाली तरी हरकत नाही. देवगडच्या विकासासाठी देवगडच्या तरुणांनी एकत्र या आणि माझ्या देवगडचे नाव जगाच्या पाठीवर घेऊन चला. नितेश राणे सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. 

 देवगड स्पोर्टस् क्लब आणि देवगड अँगलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मिठमुंबरी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फिशिंग टुर्नामेंट २०२६’  या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अर्बन बँक देवगडचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोसकर, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभापती तन्वी चांदोस्कर बुवा तारी, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, देवगड स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष ललित चांदोरकर, किरण पाटील, सोहम पारकर, चिन्मय खानविलकर आदी उपस्थित होते.

 यावेळी मंत्री राणे पुढे म्हणाले, “देवगडमध्ये काहीतरी नवीन घडत आहे, हे पाहून माझ्यापेक्षा अधिक आनंद कोणालाच होणार नाही. लोकांनी देवगडमध्ये यावे, देवगडचे नाव घ्यावे आणि देवगडचे नाव मोठे व्हावे, ही माझी पहिल्या दिवसापासून अपेक्षा आहे,” “या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्याला आणि राज्याला आपण चांगला संदेश दिला आहे. जगात किंवा राज्यातील कोणत्याही किनारपट्टीवर घडले नसेल, अशी स्पर्धा देवगडमध्ये घेऊन दाखवली, याचा मला अभिमान वाटतो,” असेही त्यांनी नमूद केले.पर्यटनाच्या नकाशावर देवगडला ठळक स्थान मिळवून द्यायचे असेल, तर पारंपरिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन साहसी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. देशात आणि जगभर सुरू असलेल्या विविध अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा अभ्यास करून देवगडमध्येही अशा नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यातून स्थानिक तरुण, मच्छीमार समाज आणि क्रीडाप्रेमींना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईलच. देवगड स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात संधी देतानाच देवगडची आरोग्यदायी आणि क्रीडाप्रेमी तालुका अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्याच कार्यक्रमातून क्लबने भविष्यातील मोठ्या उपक्रमांची दिशा दाखवून दिली आहे. असेही राणे म्हणाले. 

  मिठमुंबरी बीचवर रविवारी समुद्रातील मासेमारी कौशल्याचा थरार अनुभवायला मिळाला.  ‘फिशिंग टुर्नामेंट २०२६’ मध्ये कोकण, गोवा आणि कर्नाटकातील नामांकित एंग्लर्सनी सहभाग घेतला. ४.७४० किलो वजनाच्या वाघळी माशाची पकड करत समीर लाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. देवगड स्पोर्टस् क्लबच्या पहिल्याच स्पोर्टिंग इव्हेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने देवगडच्या साहसी क्रीडा पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

स्पर्धेतील पहिली पकड ललित परब यांनी सकाळी ८.२६ वाजता, तर शेवटची पकड तोडणकर यांनी दुपारी १.५५ वाजता केली. स्पर्धेत सर्वाधिक चार पकडी करण्याचा मान अनंत सावंत यांनी मिळवला.४.७४० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांनी प्रथम क्रमांक, ३.३०० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी मंदार रेगे यांनी द्वितीय क्रमांक, तर २.३८० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी नयन सुतार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

 देवगड स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष ललित चांदोस्कर यांनी स्पर्धेची थीम ‘Say No to Drugs’ ठेवण्यात आली होती. तरुणांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि आरोग्यदायी, सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

‘कॅच अँड रिलीज’मधून पर्यावरण संवर्धन

स्पर्धेदरम्यान पकडलेले मासे ‘कॅच अँड रिलीज’ पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे भान राखत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगताना या कार्यक्रमास विविध स्तरातील मान्यवरांनी शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तसेच देवगड स्पोर्ट  क्लबच्या टीमचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.