
दोडामार्ग : गेल्या काही दिवसांपासुन कळपापासून विभक्त झालेला ओंकार हत्ती सध्या वन विभागाच्या पथकासाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्याला पुन्हा हत्तींच्या कळपात सामील करण्यासाठी वन कर्मचारी खाद्यपदार्थांचा आधार घेत त्याला नेत असतानाच आडाळी माऊली मंदिर परिसरात ओंकार चक्क एका दुकानात घुसला. दुकानातील पिशवी सोंडेने उचलून घेतली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याला पुढे कळणेच्या दिशेने नेले. सध्या भिकेकोनाळ, कुंब्रल, शिरवल, केर, मोर्ले या मार्गाने त्याला कळपाच्या दिशेने नेण्याची मोहीम सुरू आहे.
दोडामार्ग तालुक्यात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीचे नुकसान होण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, हत्तींच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अपेक्षित प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेतकरी वर्गातून वन विभागाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. कळपातील बलाढ्य बाहुबली आणि ओंकार यांच्यातील संघर्षामुळे ओंकार वारंवार कळपापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही त्याने तीन वेळा कळप सोडून गोवा, बांदा आणि इन्सुली परिसर गाठला होता.
काही काळ भटकंती केल्यानंतर तो पुन्हा आपल्या मूळ परिसरात परतला. मोर्ले-केर परिसरात कळपाशी जुळवून घेण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. मात्र गेल्या आठवड्यात पुन्हा ओंकार कळपापासून वेगळा झाला. सासोलीपासून भिकेकोनाळ, कळणे, फोंडये, डिंगणे मार्गे त्याने मोपापर्यंत मजल मारली. त्यानंतर डिंगणे गावातही त्याचा वावर दिसून आला. पुढे दोडामार्ग-बांदा राज्य मार्गावर ओंकार आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. हत्ती रस्त्यावर आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
केळी दाखवत कळपाच्या दिशेने वाटचाल
ओंकारला कळपाशी पुन्हा जोडण्यासाठी वन विभागाने विशेष पथक तैनात केले आहे. त्याला केळी व अन्य खाद्यपदार्थ देत किंवा दाखवत सुरक्षितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोरगाव, आडाळी आणि कळणे असा प्रवास सुरू असताना आडाळी माऊली मंदिराजवळील शाळेसमोरील एका दुकानात ओंकार शिरला. दुकानातील पिशवी त्याने सोंडेने उचलल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वन कर्मचाऱ्यांनी त्याला तेथून बाहेर काढत पुढील मार्गाने कळणेच्या दिशेने नेले.
कळणे-उगाडे मार्गावरून ओंकारला भिकेकोनाळमार्गे कुंब्रल, शिरवल, केर आणि मोर्लेच्या दिशेने नेले जात असताना त्याने अचानक नदीपात्र गाठले. पाण्यात उतरल्यानंतर त्याने बराच वेळ तेथेच मुक्काम केला. मनसोक्त डुबकी घेतली. सध्या वन विभागाच्या पथकाला ओंकारला कुंब्रलपर्यंत नेण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, कळपात परतल्यानंतर बलाढ्य बाहुबलीकडून त्याला पुन्हा हुसकावून लावले जात असल्याने ओंकारला कळपात स्थिर करण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे ओंकारला अखेर कळपात सामील करण्यात वन विभागाला यश मिळणार का? याकडे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










