
देवगड : ग्रामपातळीवर सलोखा, बंधुभाव आणि तंटामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची पावती देत किंजवडे ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिलीप कदम यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.१५ ऑगस्ट रोजी होणारी तहकूब ग्रामसभा २७ ऑगस्ट रोजी सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या ग्रामसभेत मागील वर्षभरात तंटामुक्त समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित न्यायाच्या सूत्रांना अधीन राहून समितीचे कामकाज समाधानकारक व सातत्यपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांनी दिलीप कदम यांच्या कार्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला.
ग्रामसभेत अध्यक्षपदासाठी दिलीप कदम यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर त्यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल ग्रामस्थांसह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी ग्रामसेवक राऊळ, तलाठी अमित झाडे, कृषिसेवक महेश सोनार, आरोग्य सेवक डॉ. कोरडे, माजी मुख्याध्यापक आनंद कदम, किरण टेंबुलकर, गिरीश चव्हाण, संजय आचरेकर, प्रमोद परब, दत्तात्रय किंजवडेकर, आशा सुर्वे, बबलू परब, प्रविण तेली, उपसरपंच विनय पाडावे, जयदास परब यांच्यासह सुमारे ९० ग्रामस्थ उपस्थित होते.










