LIVE UPDATES

कसई - दोडामार्गमध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण - भूमिपूजन

​पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: लवू परब
Published on: June 16, 2026 15:45 PM
views 41  views

​दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचा भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते या विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. सिंधुरत्न समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेला हा पहिलाच उद्घाटन सोहळा होता.

​तळ्याचे सुशोभीकरण (लोकार्पण) व पर्यटनातून रोजगार निर्मिती

​'सिंधुरत्न समृद्ध योजने' अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्रमांक १८९ लगत असलेल्या तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, याचे लोकार्पण पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

​"भविष्यात दोडामार्ग शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. मोपा विमानतळावरून गोव्यात उतरणारे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातात. हे पर्यटक दोडामार्ग शहरात थांबले पाहिजेत, यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटक शहरात थांबल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना आणि अन्य व्यवसायांना मोठी चालना मिळेल, दरडोई उत्पन्न वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल."​यासाठी सिंधुरत्न योजनेतून आवश्यक तो निधी मंजूर करून दिला जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी पर्यटकांना आकर्षित करेल असा विशेष आराखडा सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला व नगरपंचायतीला केल्या.

'नमो गार्डन' प्रकल्पाचे भूमिपूजन

​याच सोहळ्यात 'वैशिष्ट्यपूर्ण योजने' अंतर्गत नगरपंचायत हद्दीत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या 'नमो गार्डन' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळाही पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात पार पडला. हे गार्डन शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​नगरपंचायतीच्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

​कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांनी नगरपंचायतीच्या कारभाराचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "नगरपंचायतीचे पदाधिकारी तरुण आणि उत्साही असून अतिशय चांगलं काम करत आहेत. शहरात वेगवेगळ्या शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून, प्रशासनाला नगरपंचायतीकडून अतिशय उत्तम सहकार्य लाभत आहे."

​या भव्य सोहळ्याला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे, नितीन माणेरीकर, सभापती पार्वती गवस, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेनेचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, मुख्याधिकारी श्री. संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीम. संजना म्हावळणकर यांच्यासह कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.