LIVE UPDATES

रेबीज प्रतिबंधासाठी देवगडात १३७ श्वान -मांजरींचे लसीकरण

जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुसंवर्धन विभाग, नगरपंचायतीचा संयुक्त उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 11:09 AM
views 56  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून सेवा संकल्प अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभाग, देवगड आणि नगरपंचायत देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने Mass Rabies Vaccination Programme तसेच रेबीज या विषाणूजन्य झुनोटिक आजाराबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ११० पाळीव व भटकी कुत्री आणि २७ पाळीव मांजरे अशा एकूण १३७ प्राण्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

रेबीज हा अत्यंत गंभीर आणि महाभयंकर विषाणूजन्य आजार असून, पाळीव अथवा भटक्या कुत्र्या-मांजरांच्या माध्यमातून त्याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उपस्थितांना रेबीजचा संसर्ग कसा होतो, प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, तसेच रेबीजपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करण्याचे महत्त्व, भटक्या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे आणि प्राण्यांच्या चाव्याची घटना घडल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.या महत्त्वपूर्ण उपक्रमास देवगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरीदत्त माने तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा जनजागृती व लसीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी पाळीव तसेच भटक्या प्राण्यांचे वेळेत लसीकरण करणे आणि नागरिकांमध्ये याबाबत सातत्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.