LIVE UPDATES

शिष्यवृत्ती परीक्षेत यश म्हणजे भविष्यातील आत्मविश्वासाची भक्कम सुरुवात

तेजस नलवडे यांचे प्रतिपादन ; प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाच्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 11:34 AM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली :  सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली यशाची पायरी आहे. या परीक्षेत तुम्ही यशस्वी झालात,की, पुढील प्रत्येक परीक्षेत तुम्ही आत्मविश्वासाने पुढे यशस्वी व्हाल.असे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी केले. 

प. पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळातर्फे संस्थानाच्या सभागृहात शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी श्री. नलवडे बोलत होते. यावेळी प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव निवृत्ती धडाम, खजिनदार यशवंत उर्फ दादा नार्वेकर, विश्वस्त मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे, काशीराम कसालकर, शरद हिंदळेकर, व्यवस्थापक विजय केळुसकर,शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, प्रा.दिवाकर मुरकर,मुख्याध्यापिका अक्षया राणे आदी उपस्थित होते.

सुरेश कामत म्हणाले, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर असतात. ही बाब मंडळाच्या अभिमानास्पद आहे.शिष्यवृत्ती सराव वर्ग व परीक्षेसाठी शैक्षणिक मंडळाची टीम अहोरात्र मेहनत घेते. त्यांच्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती सराव परीक्षेची दखल मंत्रालयास्तरावर घेतली गेली आहे. 

दिवाकर मुरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीमध्ये पालकाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प.पू. भालचंद्र महाराज शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा व संगणक कौशल्य आत्मसात करणे काळाजी गरज आहे. 

गजानन उपरकर म्हणाले, चौथी,सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा वर्ग ही एक सुवर्णं संधी आहे. शिक्षकांसोबतच पालक देखील जागृत आहेत. यामुळे प. पू. भालचंद्र महाराज शैक्षणिक मंडळाच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेला प्रतिसाद कायम मिळत आहे. १३ रविवारमध्ये हे सराव परीक्षेचे वर्ग चालू असणार आहेत. ठरलेल्या वेळेतचे हे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास यश दूर नाही. सातत्य, चिकाटी आत्मविशस ही यशाची गुरुकिल्ली आहे.

विजय केळुस्कर म्हणाले, प. पू. भालचंद्र महाराज संस्थान १९७४ ला रजिस्टर झाले. संस्थानात दर महिन्यात कोणता ना कोणता कार्यक्रम हा दिमाखदार होतो. याशिवाय संस्थानामार्फत वैद्यकीय सेवा केंद्रातून सेवा पुरवली जाते. १९८२ साली बाणविलकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात लावलेल हे रोपटे आज विस्तारताना दिसते आहे. शैक्षणिक मंडळातील शिक्षक तन मन धन लावून या काम पाहत आहेत. त्याच कौतुक करणे गरजेचे आहे. संस्थेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेची दखल मंत्रालय स्तरावर घेतली गेली. ही बाब कौतुकास्पद आहे. श्री. आडेलकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. पालकामधून मनोज पीळणकर यांनी मनोगत व्यक्त केले.तर यावेळी संस्थानातर्फे तेजस नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. नलवडे यांनी विद्यार्थ्यांना मैत्री दीनाच्या शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविक सदानंदन गावकर,सूत्रसंचालन किरण कोरगावकर यांनी केले. तर आभार  विष्णू सुतार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ कसालकर, प्रकाश परब, सुहास आरोलकर, मंगेश तेली श्रीकृष्ण कांबळी यांनी मेहनत घेतली यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.