
सिंधुदुर्ग : अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला महामार्ग पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ३८ लाख ४० हजार रुपयांच्या दारूसह १७ लाखाचा टेम्पो, असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नितीन तांबोसकर (वय ३७, रा. चराठे टेंबवाडी, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई तळेरे औदुंबर नगर येथे महामार्ग पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, विजय बिर्जे, एकनाथ सरमळकर, नितीन शेट्ये, श्री. खडपकर, सागर परब यांनी ही धडक कारवाई केली आहे.










