LIVE UPDATES

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावी

विनोद नाईक-राणे यांचे आमदार सुलभा गायकवाड यांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 10:52 AM
views 18  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पुरेशी आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करावी, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई) अध्यक्ष विनोद नाईक-राणे यांनी उल्हासनगरच्या आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करण्यासाठी या पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासह इतर विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर सध्या रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, हे पाणी पुरेसे पडत नाही. त्यामुळे टर्मिनससाठी एक विशेष व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आमदार सुलभा गायकवाड यांनी यापूर्वी गरीब रथ, राजधानी आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांच्या थांब्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे रेल्वेमंत्र्यांनी या तिन्ही गाड्यांना थांबा मंजूर केला असून या गाड्या सुरू झाल्या आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी दैनंदिन एक्स्प्रेस गाडीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे नामकरण ‘लोकमान्य प्रा. मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सावंतवाडी टर्मिनसच्या उर्वरित सुविधा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.