LIVE UPDATES

गोठोस येथे आधुनिक भात लागवड तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिके

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 'कृषिरत्न' गटातील कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 26, 2026 16:10 PM
views 4  views

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत 'कृषिरत्न' गटातील कृषिदूतांनी कुडाळ तालुक्यातील गोठोस गावात शेतकऱ्यांसाठी आधुनिक भात लागवड तंत्रज्ञानावर विविध प्रात्यक्षिकांचे यशस्वी आयोजन केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेती पद्धतींची माहिती देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात जमीन पूर्वमशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी अवजारांच्या प्रात्यक्षिकाने झाली. यामध्ये पॉवर टिलर व इतर आधुनिक अवजारांचा योग्य वापर, कार्यपद्धती आणि सुरक्षित हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यांत्रिकीकरणामुळे वेळ, मजुरी आणि एकंदरीत उत्पादन खर्चात कशी बचत होते, हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले. याशिवाय, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया (PSB) द्रावणाची निर्मिती करून भात रोपांवर ३० मिनिटे प्रक्रिया करण्याचे महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे जमिनीतील अघुलनशील स्फुरद पिकांना उपलब्ध होतो, मुळांची जोमदार वाढ होते, रोपे सशक्त बनतात आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन वाढीस चालना मिळते, अशी माहिती कृषिदूतांनी दिली.

पारंपरिक पद्धतीस फाटा देत २५ × २५ सेंमी अंतर ठेवून ओळीमध्ये भात रोपांची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या पद्धतीमुळे प्रत्येक रोपाला सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळतात. तसेच आंतरमशागत, तण नियंत्रण, तसेच खत व पाणी व्यवस्थापन सुलभ होत असल्याने निरोगी पिकांची वाढ होऊन अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कृषिदूतांनी सर्व प्रात्यक्षिके प्रत्यक्षात करून दाखवत त्यामागील शास्त्रीय कारणे अत्यंत सोप्या भाषेत समजवून सांगितली. या उपक्रमास गोठोस गावातील शेतकऱ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेक शेतकऱ्यांनी आगामी हंगामात आपल्या शेतात या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे. हा यशस्वी कार्यक्रम 'कृषिरत्न' RAWE गटाच्या वतीने RAWE कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप गुरव तसेच कृषी महाविद्यालय, दापोली येथील डॉ. चव्हाण, डॉ. पाठक आणि डॉ. पोतफोडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यापीठातील संशोधनाधारित तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शाश्वत व फायदेशीर शेतीला मोठी चालना मिळत आहे, असा सूर यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.